ठाणे : घोडबंदर मार्गावरील वाढत्या वाहतुक कोंडीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवजड वाहनांना घोडबंदर भागात रात्री १२ नंतरच प्रवेश दिला जावा असे आदेश काढले असले तरीही महामुंबईतील प्रमुख शहरांना बसलेला हा अवजड वाहतुकीचा वेढा या आदेशानंतर तरी सुटेल का असा सवाल उपस्थित केला जात आहे. स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा स्वरुपाचे लेखी आणि तोंडी आदेश यापूर्वी अनेकदा काढले आहेत.
उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदर, भिवंडी ते शहापूर पर्यंत पसरलेला गोदामांचा विस्तीर्ण पट्टा, गेल्याकाही वर्षांपासून गुजरातमधील औद्योगिक पट्ट्यातील मुंबई दिशेकडील वाढलेली अवजड वाहनांची वाहतुक पाहाता प्रशासकीय यंत्रणा हे नियोजन करताना मोडून पडतात असा अनुभव आहे. त्यामुळे शिंदे यांच्या आदेशानंतरही मंगळवारी दिवसभर झालेल्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे यंत्रणेचे अपयश पुन्हा एकदा दिसून आले.
घोडबंदर मार्गालगत मागील काही वर्षांमध्ये नागरिकरण वाढले आहे. या भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरु असल्याने सेवा रस्ते, मुख्य रस्त्यांवर मेट्रोचे खांब उभे राहले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. त्यातच उरण जेएनपीए बंदरातून गुजरातच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या आणि गुजरात येथून ठाणे, भिवंडी आणि उरण जेएनपीएमध्ये वाहतुक करतात.
बोरीवली, वसई, विरार भागात एसटी, परिवहन सेवेच्या बसगाड्यांची वाहतुक सुरु असते. परंतु घोडबंदर भागात रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. अवजड वाहनांचा भार वाढल्यास वाहतुक कोंडी होते. वाहन चालकांचा मिनीटांचा प्रवास तासांवर गेला आहे. घोडबंदरच्या समस्येविषयी अनेक बैठका अधिकारी आणि मंत्र्यांच्या झाल्या. परंतु कोंडीचा प्रश्न सुटू शकला नाही.
ठाणे शहरात प्रवेश करणारी अवजड वाहने पालघर, वसई-विरार-मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालय आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून येतात. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अवजड वाहनांना दुपारी १२ ते सायंकाळी ४ आणि रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत परवानगी असतानाही पालघर, वसई, मिरा रोड भागात प्रवेशबंदीच्या कालावधीत वाहने रोखली जात नसल्याने तसेच समन्वयाअभावी ही वाहने ठाण्यात प्रवेश करत होती. त्यामुळे त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर होत आहे.
घोडबंदर येथे मागील शुक्रवारी नागरिकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. त्यानंतर सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक बैठक घेऊन रात्री १२ नंतरच अवजड वाहनांना प्रवेश देण्याचे आदेश दिले. शिंदे यांच्या आदेशानंतर रात्री १२ वाजेपासून मध्य रात्री अवजड वाहनांना प्रवेश असेल. परंतु हे आदेश पाळले जातील का, असा प्रश्न ठाणेकरांना आहे.
आदेश किती
– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घोडबंदर मार्गावरील अवजड वाहनांची वाहतुक भिवंडी मार्गे वळविण्याच्या सूचना केल्या होत्या. या अजब सूचनेविरोधात भिवंडीतील नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे पोलिसांकडून सूचनेची अंमलबजावणी झाली नाही.
– ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी गणेशोत्सवाच्या काळात अवजड वाहनांना दिवसा प्रवेशबंदी लागू केली होती. परंतु समन्वयाअभावी अवजड वाहने प्रवेश करत असल्याचे दिसून आले.
– सुमारे महिन्याभरापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासोबत बैठक घेऊन शहरातील खड्डे बुजविण्याचे आणि वाहतुक कोंडी सोडविण्याचे आदेश दिले होते. तसेच समस्येविषयी संताप व्यक्त केला होता.
घोडबंदरचे नागरिक रस्त्यावर
– घोडबंदर मार्गावर १२ सप्टेंबरला स्थानिक रहिवाशांनी एकत्र येऊन आंदोलन केले होते. या आंदोलनात नागरिकांनी उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची विनंती केली होती. अखेर सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलक, पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. मंगळवारी घोडबंदर भागातील काही नागरिकांनी एकत्र येऊन खड्डे आणि वाहतुक कोंडीच्या समस्येविषयी नागलाबंदर येथे आंदोलन केले. या आंदोलनावेळी रस्ता अडविण्याचा देखील प्रयत्न झाला.
१२ नंतर अवजड वाहनांना प्रवेशबंदीचे आदेश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री १२ नंतर अवजड वाहनांना प्रवेशबंदीचे आदेश दिले. परंतु या आदेशाबाबत मंगळवारी सायंकाळी पर्यंत स्पष्टता नव्हती. घोडबंदर मार्गावर दिवसा अवजड बंदी असल्यास दिवसा अवजड वाहने कुठून प्रवेश करतील हे समजू शकले नव्हते.
प्रवासासाठी किमान दोन ते अडीच तास
मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरुन प्रवास सुसाट झाल्यास समृद्धी महामार्गाच्या वेशीवरील आमने येथून ठाणे शहरातील प्रवास अत्यंत वाईट अवस्थेत असतो. आमने ते ठाणे या प्रवासासाठी किमान दोन ते अडीच तास कोंडीमुळे जातात.