डोंबिवली– मागील काही महिने डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवरुन गायब झालेले फेरीवाले पुन्हा सकाळपासून प्रवाशांच्या वर्दळीच्या वेळेत स्कायवॉकवर दुतर्फा बसू लागले आहेत. स्कायवॉकच्या दुतर्फा जागा अडवून फेरीवाले बसत असल्याने प्रवाशांना अरुंद वाटेतून येजा करावी लागते. पावसाळाचे दिवस असल्याने प्रवाशांच्या हातात भिजलेली छत्री, हातात पिशवी, रेनकोटधारी प्रवासी अशा गर्दीतून वाट काढत जाताना फेरीवाल्यांचा त्रास सुरू झाल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक महिन्यानंतर प्रथमच फेरीवाले रेल्वे स्कायवॉकच्या प्रवेशव्दारावर विक्रीसाठी बसू लागल्याने या फेरीवाल्यांना कोणाचा आशीर्वाद आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. ग आणि फ प्रभागात फेरीवाल्यांविरुध्द जोरदार कारवाई सुरू असते. सोमवारचा रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचा बाजार कायमचा बंद करण्यात दोन्ही प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी महत्वाची कामगिरी केली.

हेही वाचा >>> डोंबिवली जवळील जलमय चाळींमधील कुटुंबीयांची सुटका

प्रवासी मागील काही महिन्यांपासून रेल्वे स्थानक परिसरातून फेरीवाले गायब असल्याने पदपथ, चालायला मोकळे रस्ते असल्याने समाधान व्यक्त करत आहेत. अचानक मागील काही दिवसांपासून सकाळ ते रात्री उशिरापर्यंत काही फेरीवाले बिनधास्तपणे स्कायवॉकवर व्यवसाय करत असल्याने प्रवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत. फ प्रभागाच्या अंतर्गत स्कायवॉकचा भाग येतो. या प्रभागात फेरीवाले हटविण्यासाठी १५ हून अधिक कामगार आहेत. त्यांना स्कायवॉकवर बसलेले फेरीवाले दिसत नाहीत का, असे प्रश्न प्रवाशांकडून केले जात आहेत.

आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी साहाय्यक आयुक्तांना रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची कठोर अंमलबजावणी साहाय्यक आयुक्तांकडून केली जात आहे. अशा परिस्थितीत डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील स्कायवॉकवर अचानक फेरीवाले प्रवाशांचा येण्याचा जाण्याचा रस्ता अडवून व्यवसाय करू लागल्याने या फेरीवाल्यांवर पालिकेने दंडात्मक कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.

हेही वाचा >>> ठाण्यात उड्डाणपुलांखाली बनले धबधबे ; अपघातांची भीती

“ फ प्रभागांकडून रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरूच आहे. स्कायवाॅकवर एकही फेरीवाला बसणार नाही याची काळजी घेत आहे. गुरुवारी मानपाडा येथील एका बेकायदा इमारतीवर कारवाईसाठी पथकासह आलो आहोत. त्याचा गैरफायदा घेऊन फेीरीवाले तेथे बसले असावेत. माहिती काढून संबंधित फेरीवाल्यांवर कारवाई केली जाईल. ” चंद्रकांत जगताप- साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग, डोंबिवली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hawkers on skywalks hawker stall on the skywalk of dombivli railway station zws