कल्याण – कल्याण, डोंबिवली शहर परिसरात रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सखल भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडले आहेत. रस्त्यावरील खड्डयांमध्ये पाणी साचल्याने रस्त्यावरील वाहतूक संथगतीने सुरू आहे. बाजारपेठांमधील गर्दीचे प्रमाण कमी आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरूवारी रात्रीपासून पावसाने सुरूवात केली आहे. पावसाची संततधार सुरू आहे. बाजारपेठांमध्ये भाजीपाला विक्रेते छत्री घेऊन बसले आहेत. रिक्षा वाहनतळांवरील गर्दी ओसरली आहे. मुख्य वर्दळीचे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहन कोंडीचे चित्र आहे. कल्याण, डोंबिवलीतील काही शाळांनी मुसळधार पावसाचा विचार करून शाळेच्या वेळेच्या एक ते दोन तास अगोदरच शाळा सोडल्या आहेत.
मागील काही दिवसांपासून पावसाने उघडिप दिल्याने उकाडा वाढला होता. कधी पावसाची सर तर कधी उन असे चित्र अनेक दिवस होते. कल्याण, डोंंबिवली शहरांच्या अनेक भागात काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. या रस्ते कामांच्या ठिकाणी खोदकाम केलेल्या भागात पाणी तुंबले आहे. परिसरातील पर्यायी रस्ते मार्गाने वाहतूक होत असल्याने हे रस्ते वाहन कोंडीत अडकत आहेत.
डोंबिवली पश्चिमेत रेल्वे स्थानक भागातील सुभाष रस्ता दोन दिवसापूर्वी ठेकेदाराने सीमेंट काँक्रीट कामासाठी खोदला. त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी अरूंद रस्त्यांमधून वाहतूक करावी लागत आहे. यामध्ये नोकरदार वर्गाचे सर्वाधिक हाल होत आहेत. महाराष्ट्रनगरमध्ये विकास आराखड्यातील रस्त्याप्रमाणे रस्ता न करता ठेकेदाराने आठ फुटाचा निमुळता रस्ता केला आहे. रस्ता केल्यानंतर गटारांची खोदकाम केले आहे. या निमुळत्या अरूंद रस्त्यावरून जाताना प्रवाशांना कसरत करावी लागते. संततधार पावसामुळे हे भाग जलमय झाले आहेत.
मागील काही दिवसांपासून दप्तरात असलेले रेनकोट विद्यार्थ्यांनी बाहेर काढले आहेत. शाळांच्या बाहेर रंगीत, वेलबुट्टीदार रेनकोट घातलेली मुले असे चित्र आहे. पाणी तुंबलेल्या सखल भागात पालिकेच्या आपत्कालीन विभागाचे कर्मचारी गटार, तुंबलेल्या भागातील पाण्याचा निचरा करतानाचे चित्र आहे. उल्हास खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे. संततधार पाऊस सुरूच राहिला तर उल्हास नदी धोक्याच्या पातळीवरून धावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नदी काठच्या रहिवाशांनी अचानक नदीचे पाणी वाढून ते वस्तीत शिरले तर पळापळ नको म्हणून घरातील आवश्यक सामानाची बांधाबांध करून ठेवली असल्याचे चित्र आहे. पालिकेच्या आपत्कालीन विभागाचे कर्मचारी आवश्यक सामग्री घेऊन प्रभागाच्या विविध भागात फिरताना दिसत आहेत.