Thane Rain ठाणे – अवघ्या आठ दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे मूर्तीकारांची गणेश मूर्ती घडविण्याची लगबग सुरु आहे. त्यातच, ठाणे शहरात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी माजिवडा भागात असलेल्या एका गणपतीच्या कारखान्यात शिरले. यामुळे कारखान्यातील गणेशमूर्तींचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये शाडू माती आणि पीओपी मूर्तींचा समावेश होता.यातील सर्वाधिक मूर्ती बुकिंगच्या होत्या आणि त्या मूर्तींचे ९० टक्के काम पूर्ण झाले होते. यामुळे गणेश मूर्तीकार अनिकेत सोंडकर हे हतबल झाले असून आता ग्राहकांना काय उत्तर द्यायचे असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे.
ठाणे शहरात गेले दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. मंगळवारी पहाटे पासून मुसळधार पावसाने ठाणे शहरात हजेरी लावली. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले होते. तसेच काही रस्त्यांनाही नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते. यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण झाला. तर, अनेक घरांमध्येही पावसाचे पाणी शिरले होते. या दरम्यान, माजिवडा भागातील एका गणपती कारखान्यात देखील पाणी शिरले. या पाण्यामुळे कारखान्यातील गणेशमूर्तींचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.
येत्या आठ दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. त्यामुळे गणेशोत्सव कारखान्यात मुर्तींवर अखेरचा हात चालविला जात आहे. या कारखान्यातही गणेश मूर्तींचे शेवटच्या टप्प्यातील काम सुरु होते. सर्व मूर्तींचे ९० टक्के काम पूर्ण झाले होते. यातील बऱ्यापैकी मूर्ती या बुकिंगच्या होत्या. त्यात, सार्वजनिक मंडळ आणि घरगुती मूर्तींचा समावेश होता. परंतू, कारखान्यातच पाणी शिरल्याने या मूर्ती पाण्यात बुडाल्याचे दिसून आले. तर, यात काही मुर्ती तुटल्याचे पाहायला मिळाले. शाडू मातीच्या मूर्ती पूर्णपणे खराब झाल्या तर, पीओपीच्या मूर्तींचेही थोडेफार नुकसान झाले आहे, असे गणेश मूर्तीकार सोंडकर यांनी सांगितले.
Ganeshotsav 2025, Thane Rain Video: आठ दिसांवर गणेशोत्सव…अन् पावसामुळे गणेशमूर्तींचे नुकसान
— LoksattaLive (@LoksattaLive) August 19, 2025
Thane Rain ठाणे – अवघ्या आठ दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे मूर्तीकारांची गणेश मूर्ती घडविण्याची लगबग सुरु आहे. त्यातच, ठाणे शहरात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी… pic.twitter.com/HtAOSUT9tN
ठाणे महापालिकेने गणेश मुर्ती विक्री करण्यासाठी शहरातील विविध रस्त्यांच्या कडेला मंडप उभारुन परवानगी दिली आहे. परंतू, आता याच रस्त्यांच्या कडेला असलेल्या गणपती केंद्रात पावसाचे पाणी शिरत असल्याचे दिसून येत आहे.
पाऊस आला…अन् मेहनतीवर पाणी फेरले गेल
कारखान्यात पाणी शिरले तेव्हा ज्या मूर्तींचे काम सुरु होते. त्या खाली होत्या. तर, इतर मूर्ती बाकड्यावर होत्या. खाली असलेल्या मूर्तींचे ९० टक्के काम पूर्ण झाले होते.त्यावर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरु होते. अवघ्या आठ दिवसांवर गणपती आल्यामुळे मूर्तींचे काम लवकर पूर्ण करण्याची लगबग सुरु होती, परंतू, अचानक पावसाचे पाणी कारखान्यात शिरल्यामुळे आमच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले, अशी भावना मूर्तीकार अनिकेत सोंडकर यांनी व्यक्त केली.