देसई, हेदुटणे, मलंगपट्टीतील घाऊक विक्रेत्यांकडून दारूची आवक
निवडणूक काळात कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात दारूचा वापर केला जातो हे ओळखून सागावमधील चार दारू विक्रेत्यांनी निवडणूक काळात दारूची टंचाई नको म्हणून मोठय़ा प्रमाणात गावठी दारूचे साठे आपल्या अड्डय़ांवर केले आहेत. डोंबिवलीतील गावठी दारू मिळण्याचे सागाव हे एकमेव ठिकाण आहे.
सागाव परिसरात मोठय़ा संख्येने गृहसंकुले झाली आहेत. या भागातील अनेक नोकरदार महिलांना रात्रीच्या वेळेत कामावरून परतल्यानंतर या दारूडय़ांच्या जाचाला सामोरे जावे लागते. अनेक महिलांनी याविषयी स्थानिक लोकप्रतिनिधी, गस्तीवरील पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल घेतली जात नसल्याचे महिलांनी सांगितले.
नव्याने विकसित झालेल्या सागावसारख्या मध्यवर्ती ठिकाणी दिवस-रात्र गावठी दारू विकण्यात येते. तरीही पोलीस, उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना या विषयाची माहिती नसल्याने रहिवासी आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
निवडणूक प्रचाराला जोर आला की, या भागातील रोजची दारू विक्री दोन ते तीन हजार लिटरवर जाते. या दारू विक्रीतून शासनाला एक पैशाचा फायदा होत नाही. सागावपासून हाकेच्या अंतरावर मानपाडा पोलीस ठाणे, उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे. येथील अधिकाऱ्यांना आव्हान देत हे दारू विक्रेते दारू विक्री करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चवरे म्हणतात की, सागाव परिसरात दारू विक्री होत असेल तर प्रथम तेथे पाहणी केली जाईल. खात्रीलायक माहिती मिळाल्यावर त्या दारू अड्डय़ांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील.
नशा येण्यासाठी बॅटरीमधील सेल, राख यांचा वापर
या दारूमध्ये नशा येण्यासाठी बॅटरीमधील सेल, राख यांचा वापर केला जातो. दारूतील हे प्रमाण अप्रमाणित असते. देसई, हेदुटणे, मलंगपट्टी भागातून मध्यरात्री उंची वाहनांच्या डिकी, सीटखाली फुगे टाकून दारू आणली जाते.
निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने दिवसभर गस्तिपथके कल्याण, डोंबिवली, २७ गाव परिसरात फिरतात म्हणून रात्रीच्या वेळेत अड्डय़ांवर दारू आणली जाते, असे सूत्राने सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी ‘लोकसत्ता’ने या अड्डय़ांची बातमी प्रसिद्ध करताच पोलीस, उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून हे अड्डे बंद केले होते. मात्र, कारवाई झाली की दारू विक्रेते सकाळी सहा ते सकाळी नऊ आणि संध्याकाळ सात ते रात्री उशिरापर्यंत दारू विक्री करतात.
सागावमध्ये मिळालेल्या माहितीनुसार चार अड्डय़ांवर छापे टाकून ते अड्डे उद्ध्वस्त केले जातील. यापूर्वी या भागात छापेमारी करून अड्डे उद्ध्वस्त केले होते. आता पुन्हा ते अड्डे सुरू झाले असतील तर तात्काळ तेथे कारवाई केली जाईल. – अनिल पवार, उत्पादन शुल्क अधिकारी, डोंबिवली