ठाणे – मृत्यू नोंद, जन्म नोंद, विवाह नोंद यांसारखे उपयुक्त दाखले काढण्यासाठी नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयांमध्ये जावे लागते, यामध्ये नागरिकांचा अधिकचा वेळ आणि प्रवासासाठीचा पैसा खर्च होतो. ग्रामीण भागातील नागरिकांचा हा त्रास वाचविण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रायोगिक तत्त्वावर घरपोच दाखल्यांची सुविधा देणारे ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’ या नावाने संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळावर नागरिकांना घरबसल्या पाहिजे त्या दाखल्यासाठी अर्ज करता येत आहे. हा दाखला त्यांना घरपोच मिळत आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरु केलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून ४०४ नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी ३०२ नागरिकांना घरपोच सेवा देण्यात आली असून उर्वरित नागरिकांच्या दाखल्याचे काम सुरु आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली.
ठाणे जिल्ह्यात कल्याण, भिवंडी, मुरबाड, शहापूर आणि अंबरनाथ असे पाच तालुक्यांमध्ये ४३१ ग्रामपंचायची आहेत. त्या ग्रामपंचायतींमधील गाव-पाड्यांची संख्या देखील मोठी आहे. या गाव पाड्यातील नागरिकांना कोणताही दाखला काढायचा झाला तर, त्यांना तालुक्यात यावे लागते. यामध्ये त्यांचा वेळ आणि पैसा खर्च होता. शिवाय अनेकदा एका फेरीत काम होत नाही. एका दाखल्यासाठी अनेक फेऱ्या माराव्या लागता. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची दाखल्यासाठी होत असलेली ही पायपीट थांबावी, त्यांना पाहिजे तेव्हा दाखला मिळावा यासाठी ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून प्रायोगिक तत्त्वावर ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’ असे संकेतस्थळ तयार केले आहे. ग्रामपंचायतींच्या केंद्रचालक यांना यांना या उपक्रमाची जबाबदारी दिली आहे. घरपोच दाखले मिळविण्य़ासाठी सुरुवातीला नागरिकांना डोअर स्टेप डिलिव्हरी या संकेतस्थळावर अर्ज भरुन वेळ (अपॉईंटमेंट) घ्यावी लागते. त्यानंतर,ठरविलेल्या वेळेनुसार केंद्रचालक त्या अर्जदाराच्या घरी जाऊन आवश्यक कागपदत्र स्कॅन करतातत आणि ऑनलाइन सेवा प्रक्रिया पूर्ण करतात. त्यानंतर, सेवा मंजूर झाल्यावर संबंधित प्रमाणपत्र पुन्हा घरपोच पोचवले जाते.
या दाखल्यांची सेवा घरपोच
मृत्यू दाखला, जन्म दाखला, दारिद्र्यरेषेखालील दाखला, ग्रामपंचायतीचा येणे बाकी नसल्याचा दाखला, विवाह नोंदणी दाखला, नमुना नं ८ चा दाखला (मालमत्ता फेरफार), निराधार योजनेसाठी वयाचा दाखला असे लोकहक्क सेवा आयोगांतर्गत येणारे सात दाखले ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’ मार्फत देण्यात येत आहेत. त्या व्यतिरिक्त इतर विभागाचे जसे की, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र, उद्योग आधार, जीवन प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती अर्ज, पॅनकार्ड व दुरुस्ती, पासपोर्टसाठी शपथपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, शेत मोजणी अर्ज, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, राजपत्र प्रकाशन, १५ वर्षाचे रहवासी प्रमाणपत्र, खाद्य परवाना जीवन प्रमाणपत्र, हयात प्रमाणपत्र, आभाकार्ड अशा विविध सेवा या प्रणालीद्वारे घरपोच मिळू शकतात.
सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या दारी सेवा उपलब्ध करून देणे, हेच खऱ्या अर्थाने सुशासनाचे प्रतीक आहे. ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’ उपक्रमाद्वारे आम्ही प्रशासन आणि जनतेतील अंतर कमी करत आहोत. हा उपक्रम प्रत्येक गावात, प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. – रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे.