डोंबिवली – मुसळधार पावसामुळे डोंबिवली एमआयडीसी परिसरातील रस्ते, कंपन्यांचा परिसर आणि खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचा बंगला परिसर जलमय झाला आहे. एमआयडीसीतील अनेक सोसायट्या, बंगले, घरांमध्ये पाणी घुसले आहे. रस्ते वर आणि सोसायट्यांचा पाया खाली त्याचा त्रास रहिवाशांना होत आहे. दरवर्षीच्या या त्रासामुळे रहिवासी त्रस्त आहेत. एमआयडीसीतील रस्ते सीमेंट काँक्रीटचे करण्यात आले आहेत. या रस्त्यांवरून पावसाचे पाणी समतल दिशेने वाहत असल्याने दूरवरून एमआयडीसीतून नदी वाहते असे चित्र दिसत आहे.

डोंबिवली एमआयडीसीत सीमेंट काँक्रीटचे रस्ते बांंधताना अनेक ठिकाणी गटारे लहान, रस्त्यांच्या काठी उन्नत स्तरावर आहेत. काही ठिकाणी रस्त्यालगतच्या सोसायट्या, बंगले खाली आणि रस्ता दोन ते अडीच फूट उंच झाला आहे. सोसायट्यांच्या आवारात तुंबणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्ग नसल्याने हे पाणी मिळेल त्या मार्गाने वाट काढत वाहते. सोसायट्यांमधील पाणी गटारांमधून वाहून जाईल अशी सुविधा अनेक ठिकाणी एमआयडीसीमध्ये नाही. काही ठिकाणी ही सुविधा ठेकेदाराने ठेवली आहे. सोसायट्या खाली आणि गटारांमधून पाणी जाण्यासाठी असलेले छिद्र लहान अशी स्थिती आहे. त्यामुळे डोंबिवलीतील रस्ते जलमय होत आहेत, असे स्थानिक रहिवासी राजू नलावडे यांनी सांगितले.

दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे एमआयडीसीतील रस्त्यांवरील पाणी औद्योगिक क्षेत्रातील काही कंपन्यांच्या आवारात घुसत आहे. काही बंगले, सोसायट्या काल रात्रीपासून जलमय आहेत. सीमेंट रस्ते तयार करताना सोसायट्यांना विश्वासात घेऊन रस्ते, गटार बांधणी रस्ते ठेकेदाराने केली असती तर आता ही वेळ आली नसती असे अनेक सोसायट्यांचे पदाधिकारी सांगतात. रहिवाशांची चारचाकी, दुचाकी वाहने पाण्याखाली गेली आहेत.

एमआयडीसीतील रिजन्सी अनंतम प्रवेशव्दारासमोर खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचा सदगुरू बंगला आहे. या बंगल्या समोर मागील अनेक वर्षाचा नाला आहे. या नाल्यामध्ये रिजन्सी इस्टेट, गोळवली, एमआयडीसी परिसरातील पाणी वाहून जाते. मुसळधार पाऊस सुरू असला की या पाण्याच्या वेगवान आणि वाढत्या प्रवाहामुळे नाल्याची पाणी वाहून जाण्याची क्षमता संपते आणि हे पाणी खासदार बंगल्या समोर तुंबण्यास सुरूवात होते. नाल्याचा पाणी वाहून नेणारा रस्त्याखालील भाग रूंद करण्याची मागणी उद्योजक, स्थानिक रहिवाशांकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. एमआयडीसी प्रशासन या मागणीकडे लक्ष देत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

दरवर्षी मुसळधार पाऊस सुरू झाला की खासदार बंगल्या जवळील नाला दुथडी वाहतो आणि हे पाणी वाहून नेण्याची रस्त्याखालील नाल्याची क्षमता संपली की हे पाणी रस्त्यावर येते आणि त्यामुळे परिसर जलमय होतो, असे स्थानिक उद्योजक सांगतात.

‘पाणी ओसरले की बंद पडलेली वाहने सुरू करण्यासाठी दरवर्षी नागरिकांना भुर्दंड पडतो. मुंबईतील नरिमन पाॅईंट, नवी मुंबई शहरातील रस्ते समतल आहेत. तेथेही मुसळधार पाऊस पडतो पण अशी इमारती जलमय होण्याची परिस्थिती तेथे नसते. नियोजनाने रस्ते, इमारत बांधणी केली तर पावसाचा फटका बसत नाही,’ असे रहिवासी संदेश प्रभुदेसाई यांनी सांगितले.