ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून घोडबंदर भागात पाणी, रस्ते, वाहतुक कोंडीची समस्याविरोधात आता गृहसंकुलातील रहिवासी एकवटले आहे. काही दिवसांपूर्वीच एका गृहसंकुलाला पाण्यासाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा भुर्दंड भोगावा लागला होता. दुसरीकडे वाहतुक कोंडीची समस्या देखील निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी एकत्र येऊन रविवारी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस घोडबंदर भागातील विविध गृहनिर्माणसंस्थेचे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत समस्यांचा पाढा वाचला जाण्याची शक्यता आहे.
ठाण्यातील घोडबंदर हा भाग ठाण्यातील सर्वाधिक वेगाने नागरिकरण होणारा भाग आहे. नागरिकरण वाढले असले तरी येथे मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे, सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यामध्ये जोडणी अशा प्रकल्पांमुळे ठिकठिकाणी खोदकामे झाली असून येथील रस्ते अरुंद झाले आहेत. वाहनांची वर्दळ वाढत असताना खड्डे आणि वाहतुक कोंडीमुळे नागरिक बेजार झाले आहेत. वाहतुक कोंडीमुळे येथील रहिवाशांच्या कामाच्या वेळांमध्येही बदल करावा लागला आहे. अवजड वाहनांची वाहतुक, ट्रक टर्मिनस उपलब्ध नसणे यामुळे धोकादायकरित्या येथील रहिवाशांना वाहतुक करावी लागते.
उंच मजल्याच्या इमारती वाढत असताना पायाभूत सुविधांची वाणवा आहे. त्यामुळे येथील अनेक गृहसंकुलांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. येथील एका गृहसंकुलाला दीड कोटी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले होते.
काही महिन्यांपूर्वी खड्डे आणि वाहतुक कोंडीच्या समस्येविषयी नागरिकांना अक्षरश: रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची वेळ आली. घोडबंदरमधील रहिवाशांना पायाभूत सुविधा मिळविण्यासाठीही आंदोलन करावे लागत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अनेक समस्या प्रलंबित असल्याने येथील रहिवाशांनी ‘जस्टिस फाॅर घोडबंदर रोड’च्या माध्यमातून एकत्र येऊन समस्यांचा पाढा वाचण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये रस्त्यांची वाईट अवस्था, अवजड वाहनांची वाहतुक, ट्रक टर्मिनस उपलब्ध नसणे, कचरा व्यवस्थापन, अपुरा पाणी पुरवठा, खंडित विद्युत पुरवठा अशा विविध समस्यांविषयी चर्चा केली जाणार आहे. समाज माध्यमाद्वारे गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधला जात असून आतापर्यंत ७२ गृहसंकुलाच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत उपस्थित राहण्याचे ठरविले आहे. रविवारी कासारवडवली येथील राम मंदीर सभागृहात ही बैठक होणार असून येत्या काही दिवसांत आणखी गृहसंकुलातील पदाधिकाऱ्यांची नोंदणी करतील असे ‘जस्टिस फाॅर घोडबंदर रोड’च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
घोडबंदरच्या समस्येविषयी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षांसोबत बैठक होणार आहे. यामध्ये बहुतांश गृहसंकुलाचे अध्यक्ष उपस्थित राहणार असून त्यांच्या समस्या तेथे मांडणार आहेत. घोडबंदर भागात नियोजनाच्या अभावामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांचा पाठपुरावा संबंधित विभागाकडे केला जाणार आहे. – गिरीश पाटील, सदस्य, जस्टिस फाॅर घोडबंदर रोड.
