कल्याण : कल्याण पूर्वेत काटेमानिवली भागात ड प्रभाग कार्यालयाजवळ २१ कोटी रूपये खर्च करून भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाशेजारी एका खासगी संस्थेने बांधकाम करून स्मारकाच्या सौंदर्यात बाधा आणली आहे. यासंदर्भात पालिकेकडे तक्रार प्राप्त होताच, ड प्रभागाचे साहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी संबंधित संस्थेला नोटीस बजावली आहे.
ही नोटीस मिळताच स्मारकाजवळील बांधकाम काढून घेण्याचे संस्थेला सूचित करण्यात आले आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समिती आणि आंबेडकरी जनतेच्या पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून कल्याण पूर्वेत काटेमानिवली भागात डाॅ. आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे राहिले आहे. विविध भागातून नागरिक याठिकाणी येतात.
या देखण्या कलाकृतीच्या बाजुला आंबेडकर स्मारकाच्या सौंदर्याला बाधा येईल अशा पध्दतीने एका खासगी संस्थेने एक निवारा उभा केला आहे. यासंदर्भात अनेक जाणकार नागरिक, माहिती कार्यकर्ते विनोद तिवारी यांनी हा विषय पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणला. या निवाऱ्याच्या ठिकाणी नंतर पक्के बांधकाम उभे राहू शकते, अशा शक्यता अनेक नागरिकांनी व्यक्त केल्या. हे बांधकाम नंतर त्या ठिकाणाहून हटविणे अवघड होईल, असे काही नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले.
स्मारकाशेजारील बांधकामाच्या वाढत्या तक्रारी येऊ लागल्याने साहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी बीट मुकादमांसह या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली. हे बांधकाम पालिकेच्या कोणत्याही परवानग्या न घेता उभारले असल्याचे निदर्शास आल्यावर यमगर यांनी हे बांधकाम करणाऱ्या खासगी संस्थेला नोटीस बजावली आहे. हे बांधकाम स्वताहून काढून घेण्याचे नोटिसीत बजावले आहे. अन्यथा आपल्या पध्दतीने पालिका हे बांधकाम हटविणार आहे.
आंबेडकर स्मारकासाठी जागा मिळवणे, त्याची उभारणी करणे यासाठी संयोजक, पालिकेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. निधीच्या अडचणी आल्या. या सर्वांवर मात करत कल्याण पूर्व शहराच्या मध्यवर्ति ठिकाणी डाॅ. आंबेडकरांचे स्मारक उभे राहिले आहे. प्रशस्त जागेतील या स्मारकात विविध दालने आहेत. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट या स्मारकाच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागातील आंबेडकरी प्रेमी नागरिक, इतर अभ्यासक याठिकाणी नियमित भेटी देत आहेत. याठिकाणी टपऱ्या, हातगाड्या, बेकायदा बांधकामे उभी राहिली तर स्मारकाच्या सौंदर्यीकरणाला बाधा येण्याची भीती आहे. त्यामुळे याठिकाणचा निवारा तातडीने हटविण्याची मागणी आंबेडकरी नागरिकांनी केली आहे.