ठाणे : ‘स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे’ अशी बिरुदावली मिरविणाऱ्या ठाणे शहराला बेकायदा फलकांचा विळखा बसू लागला आहे. बेकायदा फलकबाजी करणाऱ्यांमध्ये जवळपास सर्वच राजकीय पक्षांचा सामावेश असून शिंदे सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून नियमाला सर्वाधिक तिलांजली दिली जात आहे. ठाणे शहरातील चौक, इमारती, मेट्रो मार्गिकेचे खांब, उड्डाणपूल जवळपास सर्वच ठिकाणी बेकायदेशीररित्या फलकबाजी केली जात असल्याने ठाणे विद्रुपाच्या दिशेने वाटचाल करत आहे. सर्वत्र फलकबाजी दिसत असताना महापालिकेचे अधिकारी मात्र मूग गिळून बसल्याचे चित्र आहे.

ठाणे शहरात गेल्याकाही वर्षांमध्ये नागरिकरण वाढले असून राजकीय पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पूर्वी पक्षातील पदाधिकाऱ्याला विचारपूर्वक पदे दिली जात होती. परंतु आता विविध संघटनांच्या नावाखाली पदे दिली जात असून त्यांच्याकडून आता पक्षाचा नेता, लोकप्रतिनिधी यांना शुभेच्छा देण्यासाठी स्पर्धा लागत आहे. या उत्साही कार्यकर्त्यांकडून शहरात अनेक ठिकाणी फलक उभारले जातात. सण उत्सवांच्या कालावधीत फलकबाजीला आणखी उत येऊ लागला आहे. नवरात्रौत्सवानिमित्ताने ठाणे शहरातील रस्त्यावर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी बेकायदा कमानी उभारल्या आहेत. दसरा साजरा झाल्यानंतरही या कमानी काढल्या गेल्या नाहीत.

ठाणे शहरात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे सुरु आहेत. येथील मेट्रोच्या खांबावर जाहीरातबाजी किंवा फलकबाजी करु नये असे आदेश आहेत. त्यानंतरही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते या खांबावर जाहीरात करत आहे. घोडबंदर, कोपरी, वागळे इस्टेट, उथळसर, नौपाडा अशा विविध भागात ही फलकबाजी केली जात असल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांत दिवाळी सण साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्तानेही ठिकठिकाणी फलकबाजी होण्याची शक्यता आहे.

याबाबत ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून फलकबाजी सुरु आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांकडूनही मोठ्याप्रमणात फलकबाजी केली जाते. परंतु या कार्यकर्त्यांना कोणीही आवर घालत नसल्याने सत्ताधाऱ्यांकडूनच नियमांना तिलांजली दिली जात असल्याचे चित्र आहे.

ठाणे शहरातील चौक, महत्त्वाच्या रस्त्याकडेला कोणीही फलक उभारू लागला आहे. अनेकजण फलक उभारणीसाठी परवानगी देखील घेत नाहीत. सर्वाधिक फलक राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचे आहेत. – रोशन भोईर, प्रवासी.