ganpati visarjan 2025 ठाणे: शहरात गुरुवारी दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. यावर्षी शहरात दीड दिवसांच्या १९ हजार ५६७ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. त्यात ११ हजार ६९५ मूर्ती पीओपीच्या होत्या. तर, ७ हजार ७८१ मूर्ती शाडू मातीच्या होत्या. राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला.
गेल्या वर्षी कृत्रिम तलावात ८ हजार ७०० मूर्तींचे विसर्जन झाले होते. यंदा ही संख्या वाढून १२ हजार ९७० झाली आहे. तर, खाडी विसर्जन घाटावर गेल्यावर्षी ६ हजार ५२० मूर्तींचे विसर्जन झाले होते. ती संख्या यंदा ३ हजार ३८२ एवढी आहे. तसेच, विशेष हौद (टाकी) व्यवस्थेत भाविकांनी मागील वर्षी १ हजार ६२१ मूर्तींचे विसर्जन केले होते. ती संख्या यावर्षी २ हजार ६१३ एवढी झाली आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या गणेश मूर्ती स्वीकृत केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण ४९५ गणेश मूर्तींचे तसेच, फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील १०७ गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
कृत्रिम तलाव, फिरते विसर्जन पथक, हौद, स्वीकृती केंद्र येथील सर्व मूर्तींचे विधिवत विसर्जन झाल्यावर पाण्याच्या तळाशी जमणाऱ्या मातीच्या गाळावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या कृती आराखड्यानुसार प्रक्रिया केली जात असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली.
सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात आणि त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचे विसजर्न खाडी घाटांवर करण्यात येत आहे. काही भाविकांनी छोट्या मूर्तीही खाडीत विसर्जन करण्याचा आग्रह धरला. त्यांना कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी महापालिका तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने वारंवार विनंती करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, पाचव्या, सातव्या आणि अकराव्या दिवशीही नागरिकांनी सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
१५ टनांहून अधिक निर्माल्य संकलित
ठाणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने यंदा गणेश विसर्जनादरम्यान १५ टनांहून अधिक निर्माल्य संकलित केले. कोलशेत, कौसा आणि ऋतूपार्क येथील खत प्रकल्पांमध्ये हे निर्माल्य बायोकंपोस्टिंग पद्धतीने सेंद्रिय खतात रूपांतरित केले जाणार आहे. त्यातील अविघटनशील घटक वेगळे करून पुर्नप्रक्रियेसाठी पाठवले जातील. यंदा प्लास्टिक व थर्मोकोलचे प्रमाण मागील वर्षीपेक्षा लक्षणीय घटले आहे.
पारसिकमध्ये विसर्जनावेळी गणेश भक्तांची गैरसोय पारसिक रेतीबंदर घाटावर गणपती विसर्जन केले जाते. परंतू, यंदा सहा फुटापर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रीम तलावात करावे असे उच्च न्यायालयाचे आदेश होते. याबाबतीत नागरिक अनभिज्ञ होते. त्यामुळे ते गणेश मूर्ती घेऊन पारसिक रेतीबंदर खाडीजवळ गेले. त्यांना तेथे गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास मनाई केली. खाडीच्या काही अंतरावर बांधण्यात आलेल्या कृत्रीम तलावात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास सांगितले. परंतू, खाडीपासून ते कृत्रीम तलावा पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड चिखल पसरलेला होता तसेच त्याठिकाणी विद्यूत व्यवस्था नव्हती, यामुळे गणेश भक्तांकडून संताप व्यक्त केला जात होता.