बदलापूर: कौटुंबीक वादातून आपल्याच कुटुंबातील सदस्यांच्या वाहनाला भर रस्त्यात जोरदार टक्कर देण्याचा प्रकार अंबरनाथ शहरात मंगळवारी समोर आला. या घटनेने अंबरनाथ बदलापूर मार्गावर एकच खळबळ उडाली. माथेफिरू वाहन चालकाच्या धडकेत रस्त्यावर दुचाकी वरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कौटुंबिक वादातून हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर अंबरनाथ मार्गावर अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या मार्गेगेवर सायंकाळच्या सुमारास दोन कार मधला टक्कर थरार पाहायला मिळाला. बदलापुरात राहणारे सतीश शर्मा याचे वडिल बिंदेश्वर शर्मा हे आपल्या कुटुंबातील सतीशची पत्नी, नातु तसेच कुटुंबातील इतर सदस्यांना आपल्या कुलाबा मुंबई येथील निवासस्थानी घेऊन निघाले होते. ते स्वत:च्या वाहनाने मुंबईच्या दिशेने जाण्यास निघाले असतानाच सतीश शर्मा याने आपली पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांसोबत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आपल्याच कुटुंबाच्या वाहनाचा पाठलाग केला. पाठलाग करता करता ते बदलापूर अंबरनाथ रत्यावरील अंबरनाथला जाणाऱ्या मार्गिकेवर आले. एम्पायर प्रकल्पा समोर येताच सतीश शर्मा याने आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या वाहनाला मागून जोरात धडक दिली. त्यावेळी इतर दोन पादचाऱ्यांना गाडीखाली फरपटत नेले.

हेही वाचा : बदलापूर लैंगिक अत्याचार खटला चालविण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती

शर्मा एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने भर रस्त्यात आपली गाडी वळवून पुन्हा आपले कुटुंबीय असलेल्या वाहनाला समोरून जोरात धडक दिली. त्यावेळी कुटुंबियांच्या वाहनाच्या मागे थांबलेल्या एका दुचाकीस्वारालाही धडक दिली. यात ओम चव्हाण आणि हर्ष बेलेकर असे दोघे जखमी झाले. एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटाला साजेसा हा थरार होत असताना रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होती. प्रत्यक्षदर्शींनी तातडीने धाव घेत जखमी आणि गाडीतील कुटुंबीयांना बाहेर काढून रुग्णालयात पोहचवले. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांची एकच धावाधाव झाली.

शेजारच्या बदलापुरात दिवसभर आंदोलनामुळे आणि रेल रोकोमुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तिकडे तैनात होता. तर रेल्वे बंद असल्याने रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली होती. त्याच गर्दीत त्या माथेफिरूने बेदरकार वाहन चालवल्याने वाहन चालकांत घबराट पसरली होती. रात्री उशिरापर्यंत सतीश शर्मा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ambernath family dispute on road collision of two cars two seriously injured css
Show comments