ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत नळजोडण्यांविरोधात पाणी पुरवठा विभागाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेत दुसऱ्या दिवशी दिवा आणि मुंब्रा भागात २७ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. या अनधिकृत नळजोडण्याप्रकरणी पालिकेकडून गुन्हे दाखल करण्याची प्रकीया सुरू असून त्याचबरोबर पालिकेने अनधिकृत टँकर भरणाप्रकरणी दोन गुन्हे दाखल केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. शहराच्या विविध भागात अनधिकृतपणे नळजोडण्या घेऊन पाण्याची चोरी केली जात असून यामुळेच पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होत असल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे येत होत्या. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, त्यानुसार, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारपासून दिवा-आगासन भागातील अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली.

यासाठी ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने विशेष मोहिम हाती घेतली असून त्यासाठी दिवा आणि मुंब्रा या भागातील अनधिकृत नळ जोडण्या खंडित करणे, अनधिकृत टँकर भरणा केंद्र काढणे यासाठी विभागनिहाय पथके तयार केली आहेत. या मोहीमेत पहिल्या दिवशी म्हणजेच, बुधवारी दिवा-आगासन भागातील २४ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई करण्यात आली होती. त्यापाठोपाठ दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरूवारी दिवा आणि मुंब्रा भागात २७ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. यामध्ये कल्याण फाटा ते वाय जंक्शन या भागातील १४ अनधिकृत व्यावसायिक तर १० निवासी नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. वाय जंक्शन ते मुंब्रा- ग्लोबल नाला आणि आगासन गाव येथे १३ निवासी अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. आगासन गाव येथे ६ नळजोडण्या तर ४ टँकर ठिकाणे उध्दवस्त करुन ६ पंप जप्त करण्यात आले. या कारवाईत पाच पंप जप्त करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.

गुन्हे दाखल

शहरांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याने टँकरने पाणी विकत घेण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. परंतु काही ठिकाणी अनधिकृतपणे टँकर भरणा केंद्र सुरू असल्याच्या तक्रारीही पुढे येत असतानाच, ठाणे महापालिकेने बुधवारी दिवा-आगासन भागात सुरू असलेल्या अनधिकृत टॅँकर भरणा केंद्रावर कारवाई केली. यामध्ये पंपांसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच, अनधिकृत टँकर भरणा केंद्र बंद करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ तीन अनधिकृत टँकर भरणा केंद्र पालिकेने गुरूवारी उध्दवस्त केले. त्याचबरोबर पालिकेने अनधिकृत टँकर भरणाप्रकरणी दोन गुन्हे दाखल केले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In diva and mumbra areas two people booked for illegal tanker filling 27 illegal tap connections disconnected asj