डोंबिवली: गणेशोत्सवाच्या काळात कल्याण डोंबिवली पालिकेला असलेली सुट्टी, त्यानंतर पालिका अधिकारी गणपती विसर्जन कार्यक्रमात व्यस्त राहत असल्याने त्याचा गैरफायदा घेत, कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ (आयरे बाजू) भूमाफियांनी रेल्वेच्या जिन्याच्या समोर प्रवाशांना अडचण होईल अशा पध्दतीने दोन दिवसांच्या कालावधीत बेकायदा गाळे उभारले आहेत. रेल्वे प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या जाण्याच्या मार्गात हे बेकायदा गाळे उभारल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

पालिकेच्या ग प्रभागाच्या अंतर्गत हा भाग येतो. शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांच्या कालावधीत कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ दोन बेकायदा गाळ्यांची उभारणी भूमाफियांनी केली. त्या गाळ्यांना तातडीने रंगरंगोटी, व्यवसायाच्या नावाचा फलक लावून गाळा जुना असल्याचे वातावरण निर्माण केले आहे. कोपर पूर्व रेल्वे स्थानकात आयरे, म्हात्रेनगर, भोपर, बालाजी गार्डन परिसरातील नागरिक येजा करतात. स्कायवाॅकचा जिना कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागात उतरतो, त्या जिन्याच्या मार्गात भूमाफियांनी प्रवाशांना होणाऱ्या अडथळ्याचा विचार न करता दोन बेकायदा व्यापारी गाळ्यांची उभारणी केली आहे. या गाळ्यांमध्ये आर. के. एन्टरप्रायझेस नावाने कार्यालय सुरू करण्यात आले आहे. दुसरा गाळा शटर लावून बंद ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा : सावत्र भावाची हत्या करणाऱ्यास सश्रम कारावास, उल्हासनगरमध्ये जमिनीच्या वादातून झाली होती हत्या

रेल्वे स्थानका समोरील मोक्याची जागा अडवून दोन बेकायदा गाळ्यांची माफियांनी उभारणी केल्याने आयरे पूर्व, कोपर पूर्व भागातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक रेल्वे प्रवासी या जागेत दुचाकी वाहने उभी करून मग रेल्वे प्रवासासाठी जात होते. त्यांचीही गैरसोय भूमाफियांनी केली आहे.

आठ महिन्यापूर्वी ग प्रभागाचा पदभार स्वीकारल्यापासून या प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी ग प्रभाग हद्दीतील सर्व बेकायदा बांधकामे बंद पाडली आहेत. प्रभागात एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही यादृष्टीने नियोजन केले आहे. एखाद्या भूमाफियाने लपून बेकायदा बांधकाम केले. त्याची तक्रार प्राप्त झाली तर तात्काळ ते बांधकाम साहाय्यक आयुक्त कुमावत यांच्याकडून भुईसपाट केले जाते. त्यामुळे बहुतांशी भूमाफिया कुमावत यांच्या आक्रमक कार्यपध्दतीमुळे अस्वस्थ आहेत.

हेही वाचा : कल्याण: २७ गावांमधील पथदिवे कामांसाठी फेरनिविदा

ग प्रभाग हद्दीत एकही नवीन बेकायदा उभे राहणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. गणपतीच्या सुट्टीच्या कालावधीत कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ बेकायदा गाळे उभारल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या गाळ्यांची माहिती घेऊन ते तात्काळ भुईसपाट केले जातील.

संजयकुमार कुमावत (साहाय्यक आयुक्त, ग प्रभाग डोंबिवली)