डोंबिवली : डोंबिवलीतील मोठागाव येथील माणकोली उड्डाण पूल पुलाच्या वजन भार तपासणीच्या कामासाठी सोमवार (ता. २९ एप्रिल ते गुरुवार (२ मे) या कालावधीत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, असे फलक मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाने (एमएमआरडीए) डोंबिवलीतील रस्त्यांवर लावले आहेत.
या पूल बंदच्या विषयावर एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता अर्जुन कोरगावकर यांना संपर्क साधला, त्यांनी संपर्काला प्रतिसाद दिला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई, ठाणे हे अंतर डोंबिवली परिसरातून कमी करणाऱ्या मोठागाव माणकोली उड्डाण पुलाचे काम गेल्या वर्षीच पूर्ण झाले आहे. या पुलाच्या भिवंडी बाजुकडील पूल ते मुंबई-नाशिक-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगतच्या पोहच रस्त्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. डोंबिवली बाजूकडील पुलाचा उतार ते रेतीबंदर रेल्वे फाटकापर्यंतच्या पोहच रस्त्याचे काम एमएमआरडीएकडून सुरू आहे. खाडीवरील पुलाचे काम पूर्ण झाल्याने आणि डोंबिवलीतील प्रवासी वाहनाने अर्धा तासात ठाणे तर एक तासात मुंबईला वाहतूक कोंडी मुक्त वातावरणातून पोहचत असल्याने प्रवासी माणकोली पुलाला आता पसंती देत आहेत.

हेही वाचा…“राजन विचारे यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचे आयोजन केल्याने एम.के. मढवी यांना अटक”, सुषमा अंधारे यांची टीका

माणकोली पुलाच्या दोन्ही बाजुची कामे सुरू असल्याने आणि काही राजकीय मंडळींच्या हस्तक्षेपामुळे शासनाने या पुलाचे उदघाटन केले नसले तरी प्रवाशांच्या वाढत्या मागणामुळे पुलाचे उद्घाटन झाले नसले तरी प्राधिकरणाला पूल प्रवाशांसाठी खुला ठेवावा लागत आहे. सुरुवातीला प्राधिकरणाने पुलाची दोन्ही प्रवेशव्दारे अडथळे लावून बंद करण्याचे प्रयत्न केले. परंतु, प्रवाशांनी ते अडथळे दूर करून प्रवास सुरूच ठेवला, अनेकदा पुलाच्या सुरक्षा रक्षकला दमदाटी करून पुलाचे अडथळे बाजुला करण्यात आले आहेत. याठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नको म्हणून अखेर प्राधिकरणाने पुलावरील वाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

या पुलावर काही धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी एमएमआरडीए घेणार नाही या बचावासाठी प्राधिकरणाने पूल अधिकृतपणे सुरू झालेला नाही त्यामुळे पुलावरून वाहतूक करू नये, असेही फलक गेल्या वर्षीच या रस्त्यावर लावले आहेत.

हेही वाचा…उद्धव ठाकरेंना झटका! ऐन निवडणुकीच्या काळात मनोहर मढवींना खंडणी प्रकरणात अटक

डोंबिवलीतून मुंबई, ठाणे, नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांना शिळफाटा रस्त्यावरील, दुर्गाडी भिवंडी कोन रस्त्यावरील कोंडीतून मुक्तता मिळत असल्याने प्रवासी माणकोली पुलाला अलीकडे सर्वाधिक पसंती देत आहेत. जड, अवजड वाहनेही या रस्त्यावरून आता धावू लागल्याने रेतीबंदर रेल्वे फाटकात, डोंबिवलीतील अंतर्गत रस्त्यांवर वाहन कोंडी होऊ लागली आहे.

हेही वाचा…रेल्वे स्थानकांवर आरपीएफची पथके नेमण्यात यावीत, रोकड वाहतूक रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक खर्च निरिक्षकांचे निर्देश

या पुलावरील वाहन भार वाढू लागल्याने एमएमआरडीएने या पुलावरील वाहन भार तपासणीचे काम येत्या चार दिवसात करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे सोमवार ते गुरुवारपर्यंत माणकोली उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद असणार आहे. प्रवाशांना हेलपाटा पडू नये म्हणून प्राधिकरणाने शनिवारी या रस्त्यावर पूल बंदचे फलक लावले आहेत. अनेक प्रवाशांना पूल बंदची माहिती मिळाली नाहीतर त्यांना पुलाजवळ जाऊन पुन्हा माघारी येऊन शिळफाटा किंवा पत्रीपूल मार्गे ठाणे, मुंबईत जावे लागणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivli mmrda to close mothagaon mankoli flyover bridge for four days for weight load checking psg