डोंबिवली – डोंबिवली पश्चिमतील रेल्वे स्थानकाचा १५० मीटरचा परिसर सोडला तर पश्चिमेच्या उर्वरित भागातील मुख्य वर्दळीचे रस्ते, चौक, गल्ल्या फेरीवाले, टपऱ्या, हातगाडी चालकांनी व्यापून टाकले आहेत. रस्ते अडवून व्यवसाय करणाऱ्या या विक्रेत्यांवर पालिकेच्या ह प्रभागाच्या फेरीवाला हटाव पथकाकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक परिसर भाजप माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळ दहा वर्षापूर्वी फेरीवाला मुक्त झाला. यामध्ये पालिकेच्या ह प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील सेवानिवृत्त पथक प्रमुख बाजीराव अहिर, विद्यमान पथक प्रमुख विजय भोईर आणि सहकाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली. दहा वर्ष उलटले तरी डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात एकही फेरीवाला बसत नाही. या भागातील काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांच्या हातगाड्या पालिकेने त्यावेळी तोडून टाकल्या. या सततच्या कारवाईमुळे पश्चिम रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त झाला आहे.
या भागातील फेरीवाले, विक्रेते आता डोंंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी रस्ता, पंडित दिनदयाळ रस्ता, सुभाष रस्ता, घनश्याम गुप्ते रस्ता, देवी चौक रस्ता भागातील पदपथ, रस्ते अडवून व्यवसाय करत आहेत. शहराच्या आतील भागातील गरीबाचापाडा, श्रीधर म्हात्रे चौक, महात्मा फुले चौक रस्त्यावर कोल्हापुरे चौक ते स्वामी विवेकानंद शाळा परिसर, उमेशनगर, देवीचापाडा गोपनाथ चौक, पंडित दिनदयाळ रस्ता, सम्राट चौक भागातील चौक संध्याकाळी चार वाजल्यांपासून ते रात्री उशिरापर्यंत चायनिज, वडापाव, आईसक्रिमच्या गाड्यांनी बजबजून गेलेला असतो. गरीबाचापाड्यात संत तुकाराम महाराज रस्त्यावर प्रकाश प्रतिमा इमारतीच्या समोर संध्याकाळच्या वेळेत रस्ता, पदपथ अडवून मासळी बाजार भरतो. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो.
पावसाचे दिवस सुरू झाले आहेत. उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर पालिकेकडून बंदी घातली जाते. या खाद्य पदार्थ विक्रीच्या हातगाड्या डोंबिवली पश्चिमेत राजरोस सुरू आहेत. डोंबिवली ह प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी रेल्वे स्थानक भागात जाऊन तळ ठोकून बसतात. तेथे अनावश्यक वेळ घालवितात. त्याऐवजी या पथकाने डोंबिवली पश्चिमेत शहराच्या विविध भागातील रस्ते, चौक, पदपथ अडवून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.
या विक्रेत्यांमुळे डोंबिवली पश्चिमेत संध्याकाळच्या वेळेत रस्ते, चौकांमध्ये वाहतूक कोंडी होत आहे. माणकोली पुलावरून येणारी आणि पुलाकडे जाणारी वाहतूक पश्चिमेतून होते. या वाहतुकीला या विक्रेत्यांचा अडथळा होत आहे. माणकोली पूल मार्गावरील दिनदयाळ रस्त्यावरील सम्राट चौक परिसर सकाळपासून वाहतूक कोंडीत अडकलेला असतो.
डोंबिवली पश्चिमेतील रस्ते, चौकांमधील विक्रेते, फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे नियोजन केले आहे. फेरीवाला हटाव पथकाला कारवाईचे निर्देश दिले आहेत.
राजेश सावंत, साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली.