कल्याण – लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणाऱ्या कुशीनगर एक्सप्रेसमध्ये तिकीट तपासणीसारखा पेहराव करून एक बनावट तिकीट तपासणीस प्रवाशांची तिकिटे तपासत होता. ही बाब साध्या वेशात याच एक्सप्रेसमध्ये प्रवाशांची तिकिटे तपासणाऱ्या मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणीसाच्या निदर्शास आली. रेल्वेच्या तिकीट तपासणीसांनी बनावट तिकीट तपासणीची माहिती घेताच तो बनावट असल्याचे आढळले. रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून अटक केली.

रामप्रकाश रामजीवन मंडल (४०) असे अटक करण्यात आलेल्या बनावट तिकीट तपासणीसाचे नाव आहे. ते विरार येथील बोळींज भागातील टेलिकाॅम एक्सचेंज जवळील मंडल इमारतीत राहतात. मध्य रेल्वेचे मुख्य तिकीट तपासणीस हरेश किसन दहिलकर (५३) यांनी बनावट तिकीट तपासणीसाविरुध्द कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील माहिती अशी, की लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणाऱ्या कुशीनगर एक्सप्रेसमध्ये मुख्य तिकीट तपासणीस हरेश दहिलकर यांची तिकीट तपासणीची जबाबदारी होती. ते आणि त्यांच्या सोबतचे रेल्वे सुरक्षा बळाचे जवान साध्या वेशात होते. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून डब्यांंमध्ये तिकीट तपासणी करत असताना एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकात दुपारी सव्वा दोन वाजता आली. कल्याण रेल्वे स्थानकात दहिलकर आणि त्यांच्या सोबतच्या रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी कुशीनगर एक्सप्रेसच्या गार्डकडील सामान्य डब्यात चढून प्रवासी तिकीट तपासणीचा निर्णय घेतला. गाडी सुरू होण्यापूर्वीच ते डब्यात चढले.

प्रवाशांची तिकिटे तपासत असताना त्यांना डब्यात अन्य एक तिकीट तपासणीस तिकिटे तपासत असल्याचे दिसले. त्या तपासणीविषयी दहिलकर यांना संशय आला. एक्सप्रेसमध्ये तिकीट तपासणीसाठी कोण कर्तव्यावर आहे याची माहिती रेल्वे तिकीट तपासणीसांना असते. बहुतांशी रेल्वे तिकीट तपासणीस एकमेकांना ओळखतात.

सामान्य डब्यात प्रवाशांची तिकिटे तपासत असताना मुख्य रेल्वे तिकीट तपासणीस दहिलकर यांनी त्याच डब्यात प्रवाशांची तिकिटे तपासणाऱ्या रेल्वे तिकीट तपासणीला त्यांचे नाव, त्यांचे ओळखपत्र, त्यांच्या जवळील दंडाचे पावती पुस्तक दाखविण्याची मागणी केली. यावेळी त्या बनावट रेल्वे तिकीट तपासणीची माहिती देताना बोबडी वळली. बनावट तिकीट तपासणीने आपले नाव रामप्रकाश मंडल असे सांगितले. हा बनावट तिकीट तपासणीस असल्याचे निदर्शनास येताच साध्या वेशातील रेल्वे बळाच्या जवानांनी रामप्रकाश मंडल यांना ताब्यात घेतले.

रामप्रकाश मंडल यांनी रेल्वेचे बनावट ओळखपत्र, बनावट दंड पावती तयार करून प्रवाशांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. तसेच रेल्वे, सरकारची फसवणूक केली म्हणून मुख्य तिकीट तपासणीस हरेश दहिलकर यांच्या तक्रारीवरून कल्याण लोहमार्ग पोलिसांनी रामप्रकाश मंडल यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खोंडे याप्रकरणाचा तपास करत आहेत.