कल्याण – कल्याणमधील दूधनाका येथे पालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी घेतलेल्या मरियम टाॅवर या इमारतीवर तीन वाढीव बेकायदा मजले बांधणाऱ्या दोन विकासकांच्या विरूध्द कल्याण डोंंबिवली पालिकेच्या क प्रभागाचे अधीक्षक ज्ञानेश्वर कंखरे यांनी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम कलमाने (एमआरटीपी) बाजारपेठ पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार केली. पोलिसांनी त्यावरून फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

क प्रभागाचे अधीक्षक ज्ञानेश्वर कंखरे यांनी दूधनाका भागात राहणारे मोहम्मद एच. फरीद, अफजल बेग या दोन विकासकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षी बैलबाजार भागात एका जकात माफिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूमाफियाने पालिकेच्या उद्यान, बगिच्यासाठी आरक्षित भूखंडावर बेकायदा इमारती उभारून या इमारतीमधील सदनिका नागरिकांना दस्त नोंदणी पध्दतीने विक्री केल्या आहेत. याप्रकरणी पालिकेत नोकरीला असलेल्या एका महिलेने, पालिकेने यासंदर्भात स्वतंत्र गु्न्हे बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत. बाजारपेठ पोलिसांकडून हा तपास काढून घेऊन ठाणे येथील आर्थिक गु्न्हे अन्वेषण विभागाकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. या बेकायदा इमारतीत काही वादग्रस्त अधिकाऱ्यांची गुंतवणूक असल्याची पालिका हद्दीत चर्चा आहे.

बैलबाजार भागातील या बेकायदा इमारतीचे प्रकरण ताजे असतानाच, आता दूधनाका भागातील दोन विकासकांनी पालिकेच्या नगररचना विभागाने दिलेल्या बांधकाम मंजुरीपेक्षा मरियम टाॅवर या इमारीवर वाढीव बेकायदा तीन मजले बांधून इमारत बांधकाम नियमाचा भंग केला आहे. या वाढीव बेकायदा मजल्यांंबाबत पालिकेत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालिकेच्या क प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी या इमारतीची पाहणी केली. त्यावेळी त्यांना बांधकाम मंजुरीपेक्षा तीन माळे वाढीव बांधले असल्याचे निदर्शनास आले. 

पालिकेने विकासकाला हे तीन मजले काढून टाकण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात नोटिसा देऊनही विकासक मोहम्मद फरीद, अफजल बेग वाढीव बेकायदा बांधकामे काढत नसल्याने पालिका प्रशासनाने या दोन्ही विकासकांविरुध्द महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ प्रमाणे (एमआरटीपी) गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. अधीक्षक ज्ञानेश्वर कंखरे यांनी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे दोन विकासकांविरुध्द बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

आता पालिका मरियम टाॅवर या इमारतींमधील वाढीव बेकायदा बांधकामांंवर कारवाई कधी करते याकडे तक्रारदारासह नागरिकांचे लक्ष लागले आहे. अधिकृत इमारतींवरील वाढीव बेकायदा मजला प्रकरणी विकासकांवर गुन्हे दाखल केले की त्यानंतर पालिका प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे विकासकांना अशाप्रकारचे वाढीव बेकायदा मजले वाढविण्याचे बळ मिळते, असे तक्रारदारांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी गोळवली येथील एका बेकायदा बांधकामावर तोडकामाची कारवाई कारवाईत अडथळे आणणाऱ्या दहा रहिवाशांंवर एमआरटीपीचे गुन्हे दाखल केले आहेत. डोंबिवली पश्चिमेत ह प्रभाग हद्दीत खाडी किनारा भागात बेसुमार बेकायदा चाळी उभारणीची कामे भूमाफियांकडून सुरू आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने पर्यावरणप्रेमी नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.