कल्याण: कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या मध्यभागी कल्याण-तळोजा मेट्रो मार्गिकेची कामे गेल्या महिन्यांपासून सुरू झाली आहेत. या कामांमुळे मागील दोन वर्षापासून कोंडी मुक्त झालेला शिळफाटा रस्ता पुन्हा वाहन कोंडीच्या विळख्यात अडकू लागला आहे. या कोंडीतून प्रवाशांची मुक्तता करण्यासाठी शिळफाटा दिशेने कल्याणकडे येणारी अवजड वाहने काटई-बदलापूर रस्ता, नेवाळी चौक ते मलंग रस्त्याने, चक्कीनाका दिशेने वळविण्याच्या विषयावर पालिका, वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमत झाले आहे.

तसेच, शिळफाटाकडून कल्याण दिशेने येणारी डोंबिवलीतील बहुतांशी वाहने विको नाका येथे वळण घेऊन डोंबिवलीत प्रवेश करतात.या वाहनांना मानपाडा चौक येथे मज्जाव करून ती मानपाडा रस्त्याने डोंबिवली शहरात वळविण्याचाही विचार कल्याण डोंबिवली पालिकेत झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे.

हेही वाचा : ठाणे, पालघर जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा

कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत एमएमआरडीए, एमएसआरडीसी, वाहतूक, पालिका अधिकारी उपस्थित होते. शिळफाटा रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन न करता ही कामे सुरू करण्यात आल्याने, शिळफाटा रस्त्यावरील गोळवली, विको नाका भागात वाहन कोंडीला सुरूवात झाली आहे.

मेट्रो कामांसाठी शिळफाटा रस्त्याच्या मध्यभागी अवजड खोदकाम यंत्रणा उभी करण्यात आली आहे. रस्त्याच्या मध्यभागात दो्न्ही बाजुने संरक्षित पत्रे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजुने रस्ता अरूंद झाला आहे. या अरूंद रस्त्यावरून कंटेनर, अवजड वाहने, मोटारीसह सर्व प्रकारची वाहने धावत आहेत. त्यामुळे शिळफाटा रस्त्यावर कोंडी होऊ लागली आहे. या कोंडीचा सर्वाधिक फटका नोकरदार, शाळकरी विद्यार्थी बसना बसू लागला आहे.

हेही वाचा : कल्याणमध्ये शिळफाटा रस्त्यावर मतदान ओळखपत्रांचा ढीग

या कोंडीवर उपाय करण्यासाठी पालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण होईपर्यंत शिळफाटा दिशेने कल्याण, डोंबिवलीकडे येणारी अवजड वाहने काटई नाका येथून बदलापूरमार्गे नेवाळी चौक, मलंग रस्ता, चक्कीनाका ते पत्रीपूल अशी वळविण्यात यावीत. किंवा काही वाहने बदलापूरमार्गे इच्छित स्थळी जातील. डोंबिवलीत येणारी वाहने विको नाका भागात जाऊ न देता ती मानपाडा चौकात रोखून ती मानपाडा रस्त्याने डोंबिवली शहरात सोडण्यात यावीत यामुळे सोनारपाडा, गोळवली, विको नाका भागात डोंबिवलीतील वाहनांमुळे होणारी कोंडी कमी होईल. या रस्त्यावरून फक्त लहान वाहने कल्याणच्या दिशेने धाऊ लागली तर मेट्रो कामांच्या ठिकाणी होणारी कोंडी कमी होईल, अशी चर्चा बैठकीत करण्यात आली.

हेही वाचा : डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट पाचवर छत नसल्याने प्रवाशांची तारांबळ

मेट्रो मार्गिकेच्या कामामुळे शिळफाटा रस्त्यावरील कोंडी सोडविण्यासाठी अवजड वाहने पर्यायी मार्गाने वळविणाच्या नियोजन करण्याच्या सूचना वाहतूक विभागाला केल्या आहेत. लवकरच त्याची अंमलबजावणी करून या रस्त्यावरील कोंडी कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

डाॅ. इंदुराणी जाखड (आयुक्त)