ठाणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे महापालिका प्रशासनाने मुंब्रा येथील शीळ भागातील २१ बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याबरोबरच कारवाईच्या खर्चाचा बोजा जमिनीवर टाकण्याची तयारी सुरू केली आहे. त्यापाठोपाठ आता इमारती पाडल्यानंतर जागा मोकळी झाली असून ही जागा हरित क्षेत्रात मोडत असल्याने त्यावर वृक्ष लागवड करण्याचा निर्णय प्रशानसाने घेतला आहे. यानुसार एका इमारतीच्या जागेवर वृक्ष लागवड सुरू करण्यात आली आहे.
मुंब्रा येथील शीळ भागात १७ बेकायदा इमारती उभारण्यात आल्या होत्या. हा भुखंड हरित क्षेत्रात मोडत असतानाही त्यावर बांधकाम झाले होते. या बेकायदा बांधकामाप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनाला फटकारले. तसेच शहरातील ना विकास क्षेत्र आणि हरित क्षेत्रातील बेकायदा बांधकामांवरही तातडीने कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
यानंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी १७ बेकायदा इमारतींवर कारवाई सुरू केली होती. या कारवाईदरम्यान, येथे आणखी चार बेकायदा इमारती आढळून आल्या होत्या. अशाप्रकारे एकूण २१ इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय, शहरातील इतर बेकायदा बांधकामाविरोधातही पालिकेने विशेष मोहिमेंतर्गत कारवाई सुरू केली आहे.
शीळमधील २१ बेकायदा बांधकामाच्या पाडकामाचा खर्च पालिकेच्या तिजोरीतून करण्यात आला आहे. त्यामुळे हा खर्च संबंधित जमीन मालकांकडून वसुल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. बांधकाम पाडकामासाठी अंदाजे साडेचार ते पाच कोटी रुपये इतका खर्च झाल्याचा पालिकेचे अंदाज असून हा खर्च काढण्याचे काम पालिकेमार्फत सुरू आहे. हा खर्च संबंधित जमीन मालकांकडून वसुल करण्यासाठी पालिका या जमिनीवर कारवाईच्या खर्चाचा बोजा टाकणार आहे. हा खर्च जमा केल्याशिवाय त्याठिकाणी कोणत्याही विकास कामास परवानगी मिळू नये, या उद्देशातून पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
तसेच २१ बेकायदा इमारती जमीनदोस्त झाल्यानंतर ही जागा मोकळी झाली आहे. ही जागा हरित क्षेत्रात मोडते. त्यामुळे पालिकेने याठिकाणी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय प्रशानसाने घेतला आहे. यानुसार एका इमारतीच्या जागेवर वृक्ष लागवड सुरू करण्यात आली असून उर्वरित जागेवर टप्प्याटप्याने वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.