ठाणे : ठाण्यातील वाहतुक कोंडीच्या समस्येविषयी मनसेने सोमवारी वाहतुक पोलिसांच्या तीन हात नाका येथील कार्यालयाबाहेर आंदोलन केले. तसेच शहरातील वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्याची मागणी केली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाहतुक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या कार्यालयात शिरुन त्यांना जाब विचारला.

ठाणे शहरात खराब रस्ते आणि त्यामुळे मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. घोडबंदरमध्ये दररोज वाहतुक कोंडीचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागतो. तसेच शहरातील इतर भागातही रस्त्याकडेला शाळेच्या बसगाड्या, टेम्पो उभे राहत असल्याने कोंडी होत आहे. शाळेतील विद्यार्थी, नोकरदारांना दररोज वाहतुक कोंडीत अडकावे लागत आहे. या समस्येविरोधात मनसेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वाहतुक पोलिसांच्या तीन हात नाका येथील कार्यालयाबाहेर थांबून वाहतुक कोंडीच्या समस्येविषयी आंदोलन केले. तसेच वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या कार्यालयात शिरुन त्यांना कोंडीची समस्या केव्हा सुटणार याबाबत जाब विचारला.

हलक्या वाहनांसाठी वेगळी मार्गिका सुरु करणे, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन वाहन चालकांना दंडीत करण्याचे थांबविणे अशी मागणी यावेळी करण्यात आली. ज्या प्रमाणात सुविधा देता त्याच प्रमाणात शासन करावे, अन्यथा अशी दंडात्मक कारवाई करण्याचा नैतक अधिकार नसल्याचे आंदोलक म्हणाले.