ठाणे – गेल्या काही दिवसांपासून वातावरणात होत असलेला बदल आणि फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. घशाचा संसर्ग, सर्दी, खोकला याची साथ नागरिकांमध्ये पसरली आहे. ठाणे शहरातील दवाखान्यात या आजाराने त्रस्त असलेले दिवसाला ७० ते ८० रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहित ठाण्यातील एका डॉक्टरांनी दिली.
ठाणे जिल्ह्यात यंदा दसऱ्यापर्यंत पाऊस सुरु होता. त्यानंतर, मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली होती. सकाळी ११ वाजल्यापासून कडक उन्ह पडत होते. यामुळे नागरिक देखील हैराण झाले होते. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे म्हणजे उन्हाचे चटके सोसावे लागत होते.
दिवाळीच्या एक-दोन दिवस आधीच संध्याकाळच्या वेळी पावसाने हजेरी लावली, आणि अजूनही संध्याकाळच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत. दिवसा कडक ऊन तर संध्याकाळी पडणारा पाऊस या बदलत्या हवामानामुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच दिवाळीत फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे प्रदूषणाचे प्रमाण अधिक वाढले असून, या सर्वांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. घशाचा त्रास, खवखव होणे, सर्दी, खोकला या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या काही दिवसांत सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये तब्बल ३० ते ४० टक्के वाढ झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले. सामान्य सर्दी, ताप, घशातील संसर्ग आणि श्वसनास त्रास अशा लक्षणांसह येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, असे ते म्हणाले. तर, शहरातील छोट्या दवाखान्यांमध्येही या रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवसाला ७० ते ८० रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहिती कोपरी येथील डाॅ. नंदकुमार ठाकूर यांनी दिली.
ग्रामीण भागातसुद्धा ही लाट पोहोचली असून सर्दी, खोकला आणि घसा दुखण्याचे रुग्ण वाढले आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले.
नागरिकांनी कशी काळजी घ्यावी ?
- पुरेसे पाणी आणि द्रवपदार्थ घेत राहावेत, शरीर हायड्रेटेड ठेवा.
- गरम पाण्यानी वाफ घ्यावी, कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात.
- धुळीत जाणे टाळा; बाहेर पडताना मास्कचा वापर करा.
- हात वारंवार धुणे आणि वैयक्तिक स्वच्छता राखणे आवश्यक.
- पौष्टिक आहार, फळे, भाज्या आणि व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ सेवन करावेत.
- लक्षणे वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या; स्वतः औषधे घेऊ नयेत.
बदलत्या हवामानाचा परिणाम तसेच प्रदूषणामुळे होणारा खोकला लवकर बरा होणारा नाही, त्याचा परिणाम अॅलर्जी आणि सायनस असलेल्या रुग्णांवर अधिक प्रमाणात होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक असल्याचे आरोग्य विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
