ठाणे : राम गणेश गडकरी रंगायतन ठाणेकरांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असून ठाणे शहराला गडकरी रंगायतन शिवाय शोभा नाही, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राम गणेश गडकरी रंगायतनाच्या लोकार्पण प्रसंगी मांडले.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत शुक्रवारी राम गणेश गडकरी रंगायतनची तिसरी घंटा वाजली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नूतन वास्तूचे लोकार्पण करण्यात आले. गडकरी रंगायतनमध्ये पुन्हा एकदा तिसरी घंटा वाजून पडदा बाजूला जातो आहे याचा विशेष आनंद वाटत असल्याची भावना यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.
राम गणेश गडकरी रंगायतनच्या उभारणी मध्ये ठाणेकरांचे मोठे योगदान आहे. गडकरी रंगायतन हे कलावंतांचे अविभाज्य भाग आहे. ही एक बिल्डिंग नसून ती एक जिवंत वास्तू असून ठाण्याचे हृदय असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच यासाठी राजकीय इच्छा शक्ती देखील असणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
गडकरी रंगायतन सुरु होण्याची ठाणेकर रसिक जवळपास वर्षभर वाट पाहत होते, व्यासपीठ सुन्न होते, पडदा बंद होता, अखेर आज या वास्तूची तिसरी घंटा वाजली. नाट्य गृहाची दुरुस्ती करत असताना नाट्य कलावंतांच्या आणि कलाप्रेमीच्या सूचना महत्वाच्या होत्या. त्यामुळेच दुरुस्तीला काहीसा वेळ लागला असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी नमूद केले.
या नाट्यगृहत अनेक नाटके झाली, तालीम झाल्या अनेक कलावंत घडले आणि याच ठिकाणी राजकीय सभा देखील झाल्याचे सांगत शिंदे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. गडकरी मध्ये अजूनही काही उणिवा असतील तर सांगा, गडकरी रंगायतनसाठी निधीची कमरतरता कधी पडू देणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
वास्तूची ओळख ही तेथील स्वच्छतेवरून होत असते
नाट्यगृह मध्ये रांगकर्मीसाठी ज्या पद्धतीने स्वच्छतागृह स्वच्छ ठेवले जातील तसेच येथे येणाऱ्या रसिकांसाठी असलेले स्वच्छतागृह देखील स्वच्छ ठेवले पाहिजेत, अशा सूचना यावेळी शिंदे यांनी दिल्या. स्वच्छतेवरून त्या वास्तूची ओळख कायम राहते, असेही ते म्हणाले.
ठाण्यात हापूस पार्क उभारणार
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अभय ओक यांनी ठाण्यात पूर्वी रस्त्याने जाताना हापूस आंबे खायला मिळत होते, अशी आठवण सांगितली होती. त्यांच्या या सूचनेचे पालन करून आता ठाण्यात हापुस पार्क उभारले जाणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
ठाणे वाहतूक कोंडी मुक्त होणार
ठाण्यात येत्या सप्टेंबर अखेर १०.३० किमी मेट्रोची ट्रायल रन घेतली जाणार आहे. त्यानंतर डिसेंबर अखेर पूर्ण क्षमतेने मेट्रो सुरू होणार आहे. शिवाय अंतर्गत मेट्रो चे कामही सुरू होणार आहे. तसेच ठाण्यातून एलिवेटेड रोडही जात आहे. याशिवाय विकासाची अनेक कामे ठाण्यात सुरू आहेत, त्यामुळं ठाण्यात यापुढे वाहतूक कोंडी होणार नसल्याचा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.