ठाणे : ठाणे जिल्ह्यातील तलाठी संघटनेने पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे गेल्या २० दिवसांपासून उत्पन्न दाखला मिळत नसल्याने रुग्ण, विद्यार्थी आणि नागरिक हवालदिल झाले असून त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तलाठी संघटनेने अखेर सोमवारी काम बंद आंदोलन मागे घेतले आहे. यामुळे वैद्यकीय कामासाठी रुग्णांना, शिष्यवृत्ती व स्पर्धा परिक्षांचा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि शासकीय कामांसाठी नागरिकांना उपत्न्न दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे, कल्याण, मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी आणि शहापूर असे एकूण सात तालुके ठाणे जिल्ह्यात येतात. तालुका स्तरावरील तहसील कार्यालयातून नागरिकांना उत्पन्न दाखला, रहिवास प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्र तयार करून दिली जातात. यातील उत्पन्नाच्या दाखल्यासाठी नागरिकांनी अर्ज केल्यास त्याची तपासणी तलाठींकडून केली जाते. ठाणे जिल्ह्यात दररोज तीनशे ते चारशे उत्पन्न दाखले दिले जातात. प्रत्येक तालुक्यात दररोज ५० ते ६० उत्पन्न दाखल्यांसाठी अर्ज येतात. अर्जदाराने दिलेले स्वयंघोषणापत्र आणि कागदपत्रांच्या आधारे तलाठी उत्पन्न दाखला तयार करून तो पुढे तहसीलदारांकडे पाठवितात. त्याआधारे नागरिकांना उत्पन्नाचे दाखले तहसील कार्यालयातून उपलब्ध करून दिले जातात.
तलाठींच्या अहवालानुसार दाखला देण्यात येत असल्याचा उल्लेख उत्पन्नाच्या दाखल्यावर केला जातो. यामुळे त्या दाखल्यात खोटी माहिती आढळून आली तर, संबंधित तलाठींवर कारवाई होते. काही ठिकाणी तलाठींवर गुन्हेही दाखल झालेले आहेत. या कारवाईच्या भितीमुळे तलाठींनी उत्पन्न दाखल्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या तपासणीचे काम बंद केले होते. महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या ठाणे जिल्हा विभागाने हे आंदोलन पुकारले होते. या आंदोलनामुळे ठाणे जिल्ह्यात गेल्या २० दिवसांपासून उत्पन्न दाखल्यांचे काम ठप्प झाले होते. दाखल्याविना रुग्ण, विद्यार्थी आणि नागरिकांची कामे खोळंबली होती. यावरून तलाठींवर टिका होत होती. दरम्यान, दाखल्याविना रुग्ण, विद्यार्थी आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तलाठी संघटनेने अखेर सोमवारी काम बंद आंदोलन मागे घेऊन उत्पन्न दाखला देण्याचे काम सूरु केले आहे.

तलाठींना भेडसावणाऱ्या समस्या महसुल मंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्यापुढे मांडून त्यावर तोडगा काढण्याची मागणी संघटनेने केली आहे. परंतु काम बंद आंदोलनामुळे दाखले मिळत नसल्याने रुग्ण, विद्यार्थी आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन संघटनेने आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी दाखले देण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. – नितीन पिंग‌ळे, ठाणे जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तलाठी संघ

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane district agitation of talathi is called off work on issuing of income certificate started asj