Eco Friendly Ganpati Decoration, Thane ठाणे : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून सर्वांचीच गणपतीच्या आगमनासाठी लगबग सुरु आहे. घरगुती असो वा सार्वजनिक परंतू, गणपतीची आरास ही आगळी वेगळी आकर्षक करण्यासाठी प्रत्येकजण उत्साहाने प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. काहीजण स्वत:च्या कल्पकतेने आरास घडवत आहेत तर, काहींचा तयार आरास आणण्याचा कल आहे. परंतू,तयार आरास देखील हटके आणि आकर्षक असली पाहिजे असा आग्रह प्रत्येकाचा. यंदा ठाण्यातील बाजारपेठेत पर्यावरणपूरक आरास विविध पर्याय उपलब्ध झाले असून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही आरास चर्चेचा विषय बनली आहे. त्यासह, बांबू पासून तयार करण्यात आलेले मखर देखील देखणे आणि आकर्षक दिसत आहेत.

‘ऑपरेशन सिंदूर’ वर आधारित आरास नेमकी कशी आहे ?

ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) याविषयावर आधारित तयार केलेली ही आरास साडीपासून बनविण्यात आली आहे. यावर ‘कसम सिंदूर की ’ असे साडीच्या मध्यभागी लिहिण्यात आले आहे. तर, त्याभोवती गोलाकारमध्ये ‘विघ्नहर्ता का वरदान है, यह वीरों का भारत महान है | ’ असे लिहिण्यात आले आहे. एकप्रकारे या आरासच्या माध्यमातून ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न ठाण्यातील घंटाळी रोड परिसरात असलेले आरास विक्रेते यांनी दिली.

बांबू पासून तयार केलेल्या आरासमध्ये वैविध्य

बांबू पासून तयार केलेली आरास पर्यावरणपूरक सजावटीसाठी आदर्श मानली जाते. बांबूच्या चटईला रंग देऊन त्यावर नक्षीकाम करण्यात आले आहे. तर, पानाफुलांनी सजवून, मातीचे दिवे जोडून त्या चटईला मंदिराचा आकार देण्यात आला आहे. गणपतीची ही आरास अधिक देखणी आणि आकर्षक वाटते. तर, बांबू पासून आणखी काही प्रकार उपलब्ध आहेत. जसे की, पौराणिक छत्र, झुंबर, कोकणातील मंदिराची झलक, कापडी झालर आणि लाकडी पट्ट्यांनी सजलेले सिंहासन आदी कलात्मक गोष्टींनी तयार केलेल्या या आरास देखील ग्राहकांच्या पसंतीस पडतील अशा आहेत. ठाण्यातील राम मारुती रोडवर या आरास विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

पुठ्ठा आणि कागदाचा वापर करुन साकारलेली आरास

थर्माकोलच्या आरासमुळे प्रदूषण होते. त्यामुळे अलिकडे पुठ्ठा, कागद, कापड अशा विविध पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करुन गणपतीसाठी आरास तयार केली जाते. यंदाही अशा पर्यावरण पुरक वस्तूंचा वापर करुन विविध नाविन्यपूर्ण अशा आरास बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये केदारनाथ, जेजूरी, तुळजाभवानी अशा मंदिराची प्रतिकृती पाहायला मिळत आहे. तर, सरस्वती बैठक, मॅक्रम आर्ट कलर, बुद्धीदंत बैठक, शाही बैठक असे अनेक सुबक आणि देखण्या आरास यात उपलब्ध आहेत.