ठाणे : येथील वर्तकनगर भागातील रेल्वे विभागाचे तिकीट आरक्षण केंद्र तांत्रिक कारणास्तव गेल्या महिनाभरापासून बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. याबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे विभागाला हे केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर रेल्वे विभागाने तांत्रिक अडचणी दूर करत हे केंद्र पुन्हा सुरू केल्याने ठाणे तसेच मुलूंडमधील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांचे तिकीट आरक्षण केंद्र आहे. मात्र, या केंद्रावर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागतात. परंतु काही वेळेतच रेल्वेचे तिकीट आरक्षण पुर्ण होते. यामुळे आरक्षण केंद्राबाहेरील रांगेत उभे असलेल्या काहींचा क्रमांक येईपर्यंत रेल्वेचे तिकीट आरक्षण पुर्ण होते. यामुळे अशा प्रवाशांच्या पदरी निराशा पडत होती. हा प्रकार टाळण्यासाठी रेल्वे विभागाने काही वर्षांपुर्वी वर्तकनगर भागात तिकीट आरक्षण केंद्र उभारले आणि तिथे तिकीट आरक्षित करण्याची सुविधा सुरू केली होती. याठिकाणी ठाणे, घोडबंदर तसेच मुलूंड परिसरातील नागरिक रेल्वेचे तिकीट आरक्षित करण्यासाठी येतात. परंतु गेल्या महिनाभरापासून हे केंद्र बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती.

वर्तकनगर आरक्षण केंद्रातील इंटरनेटची वाहिन्या सातत्याने तुटत असून यामुळे केंद्रातील इंटरनेट सुविधा ठप्प होत होती. यामुळे रेल्वे विभागाने हे केंद्र बंद केले होते. ऑनलाईन तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे रेल्वे विभागाकडून हे केंद्र बंद करण्याची तयारी सुरू असल्याचीही चर्चा प्रवाशांमध्ये होती. दरम्यान, हे केंद्र बंद असल्यामुळे गैरसोय होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे केल्या होत्या. त्यानंतर २३ एप्रिल रोजी मुंबईत झालेल्या बैठकीदरम्यान खासदार म्हस्के यांनी वर्तकनगर येथील आरक्षण तिकीट खिडकी लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते.

तसेच केंद्रामध्ये इंटरनेट सुविधेसाठी नवीन वाहिनी टाकण्यासाठी खासदार म्हस्के यांनी एम.टी.एन.एल आणि रेल्वे विभागामध्ये समन्वय साधुन दिला होता. यानंतर एम.टी.एन.एलने याठिकाणी इंटरनेट वाहिनी टाकून दिल्यानंतर केंद्रातील इंटरनेट सुविधा सुरळीत होताच रेल्वे विभागाने दोन दिवसांपासून हे केंद्र पुन्हा सुरू केले. या केंद्राला खासदार म्हस्के यांनी शनिवारी भेट देऊन तेथील कामांची पाहाणी केली.