लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : येथील गावदेवी मैदानात उभारण्यात आलेल्या भुमिगत वाहनतळ सुरु झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी त्याशेजारीच असलेल्या भाजी मंडई इमारतीच्या तळघरातील वाहनतळ बंदावस्थेतच असल्याचे चित्र आहे. करोना काळात जागे भाडे दरात झालेली वाढ परवडत नसल्यामुळे संबंधित ठेकेदाराने दोन वर्षांपुर्वी काम बंद केले असून तेव्हापासून २५० ते ३०० दुचाकींच्या पार्किंग क्षमतेचे हे वाहनतळ बंदच आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. अनेक प्रवासी घर ते स्थानक या वाहतूकीसाठी दुचाकीचा वापर करतात. या भागात वाहनतळाची पुरेशी सुविधा नव्हती. यामुळे नागरिक रस्त्याकडेला दुचाकी उभी करतात. या बेकायदा पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडीची समस्या निर्माण होत होती. ही कोंडी सोडविण्यासाठी पालिकेने गेल्या काही वर्षांपासून पाऊले उचलली आहेत. गावदेवी मैदानात पालिकेने स्मार्ट सिटी योजनेतून भुमगित वाहनतळ उभारून त्याचे लोकार्पण केले. या ठिकाणी १३० चाकी वाहने तर १२० दुचाकी वाहने उभी करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या वाहनतळाआधी पालिकेने त्याशेजारीच असलेल्या गावदेवी भाजी मंडई इमारतीच्या तळ घरात दुचाकी वाहनतळाची उभारणी केली. २५० ते ३०० दुचाकींच्या पार्किंग क्षमतेचे हे वाहनतळ आहे. याठिकाणी ठेकेदाराची नेमणुक करून ते नागरिकांसाठी खुले करण्यात आले होते.

हेही वाचा…. डोंबिवलीत गुरचरण जमिनीवरील बेकायदा इमारतीमधील घर खरेदीत १२ जणांची फसवणूक; बँकेसह खरेदीदारांना दोन कोटी ३६ लाखाचा चुना

हेही वाचा…. दिवा-वसई दोन रेल्वे पॅसेंजर सकाळच्या वेळेत सोडण्याची प्रवाशांची मागणी; खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांना ७०० प्रवाशांचे निवेदन

परंतु दरवर्षी जागे भाडे दरात दहा टक्के वाढ केली जात होती. ही दरवाढ परवडत नसल्यामुळे संबंधित ठेकेदाराने २०२० मध्ये वाहनतळाचे काम बंद केले. त्यानंतर दोन महिन्यात करोनाचा काळ सुरु झाला. तेव्हापासून हे वाहनतळ बंदावस्थेत आहे. त्यामुळे सुविधा असतानाही नागरिकांची गैरसोय होताना दिसून येत आहे. या ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्याठिकाणी नवीन ठेकेदार नियुक्त करण्यासंबंधी पालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रस्तावास सर्व साधारण सभेने मान्यताही दिली होती. तरीही वाहनतळ अद्याप सुरु होऊ शकलेले नाही. महापालिकेच्या संथगतीच्या कारभारामुळे नागरिक रस्त्यावर दुचाकी उभी करत असल्याने ठाणे स्थानक परिसरात वाहतूक कोंडीची समस्या होऊ लागल्याचे चित्र आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane the two wheeler parking area in the gavdevi bhaji mandai building remains closed dvr