लोकसत्ता खास प्रतिनिधी कल्याण : कर्जत, कसारा, ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरातून वसई, डहाणू, विरार परिसरात दररोज नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी, कष्टकरी, कामगार जातात. हा नोकरदार वर्ग सकाळच्या वेळेत वसई भागात जाण्यासाठी दिवा, कोपर, पनवेल रेल्वे स्थानकातून कार्यालयीन वेळेत एकही पॅसेंजर नसल्याने दादर मार्गे इच्छित स्थळी जातो. प्रवाशांचा हा वळसा टाळण्यासाठी सकाळी आठ ते सव्वा आठ आणि सकाळी नऊ ते सव्वा नऊ वेळेत दिवा रेल्वे स्थानकातून दोन पॅसेंजर वसईसाठी सोडण्यात याव्यात, अशी मागणी या रेल्वे मार्गावरुन नियमित प्रवास करणाऱ्या सुमारे ७०० हून अधिक प्रवाशांनी खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांना केली आहे. या प्रकरणाबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी बोलून योग्य निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन खा. शिंदे यांनी प्रवाशांच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी प्रवाशांतर्फे ॲड. सुनील प्रधान, कांतिभाई शहा उपस्थित होते. अप्पर कोपर रेल्वे स्थानकातून सकाळी ५.५० वाजता वसईकडे पॅसेंजर गेल्यानंतर त्यानंतर थेट सकाळी १०.१५ वाजता पॅसेंजर आहे. दरम्यानच्या चार तासाच्या काळात दिवा, पनवेलहून वसईकडे जाण्यासाठी पॅसेंजर नसल्याने अप्पर कोपर रेल्वे स्थानकात १०.१५ वाजताची किंवा त्यानंतरची पॅसेंजरने प्रवास करण्यासाठी प्रवाशांची तुफान गर्दी होते. या गर्दीमुळे प्रवाशांना पॅसेंजरमध्ये चढायला मिळत नाही. पॅसेंजरचे दरवाजे अरुंद असल्याने प्रवाशांना चढ उतर करताना धक्काबुक्की, रेटावे लागते. यामध्ये महिला प्रवाशांची सर्वाधिक कुचंबणा होते, अशी माहिती प्रवासी ॲड. प्रधान यांनी खासदारांना दिली. हेही वाचा…. कल्याणमध्ये पती-पत्नीच्या भांडणात पोलिसांना बेदम मारहाण भिवंडी जवळील कामण, खारबाव, गोवे भागात औद्योगिक विकास झाला आहे. बदलापूर, ठाणे, डोंबिवली परिसरातील नागरिक या भागात नियमित नोकरी, कामानिमित्त जातात. त्यांची सकाळच्या वेळेत कार्यालयीन वेळ गाठण्यासारखी अप्पर कोपर रेल्वे स्थानकात पॅसेंजरची सोय नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होते. अनेक प्रवासी कार्यालयीन वेळ सकाळी साडे नऊ वाजताची असली तरी सकाळची सहाची पॅसेंजर पकडून वसई भागात जातात. काही प्रवासी दादरमार्गे इच्छित स्थळी जातात, असे निवेदनात म्हटले आहे. काही प्रवासी कल्याण येथून बसने भिवंडीकडे जातात. तेथून रिक्षा प्रवास महागडा असल्याने अनेक प्रवाशांना तो परवडत नाही. त्यामुळे बहुतांशी प्रवासी अप्पर कोपर रेल्वे स्थानकातील सकाळच्या १०.१५ च्या पॅसेंजरवर अवलंबून राहतात. ही पॅसेंजर अनेक वेळा उशिरा येते. त्यामुळे नोकरदारांना कार्यालयात वेळेत पोहचता येत नाही, असे कांतिभाई शहा यांनी सांगितले. अशाच पध्दतीने संध्याकाळच्या वेळेत साडे पाच ते साडे सहा वेळेत वसई-दिवा पॅसेंजरचे नियोजन केले तर कामावरुन परतणाऱ्या प्रवाशांना वेळेत घरी येता येईल, असे खासदारांच्या निदर्शनास आणण्यात आले आहे. हेही वाचा…. ठाणे: आरटीई प्रवेशाची पहिली यादी जाहीर; २५ एप्रिलपर्यंत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन “कार्यालयीन वेळेत प्रवाशांना पॅसेंजरची सोय असावी म्हणून खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे दिवा-वसई दरम्यान सकाळी दोन पॅसेंजर सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. ते प्रवाशांना न्याय मिळून देतील असा विश्वास आहे.” - ॲड. सुनील प्रधान , प्रवासी.