ठाणे : महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा व्हावा तसेच पाणी गळती रोखली जावी, यासाठी महापालिका प्रशासनाने केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत पाणी वितरण व्यवस्था सुधारणा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांर्गत शहरातील इतर भागांसह वागळे इस्टेट परिसरात दोन जलकुंभाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने नुकतीच जागा उपलब्ध करून दिली असून याठिकाणी पालिकेने जलकुंभ उभारणीच्या कामाची प्रक्रीया सुरू केल्याने वागळे इस्टेट परिसराची जलचिंता मिटण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे शहरात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. तरी शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. पाणी वितरण व्यवस्थेतील त्रुटी आणि जुन्या जलवाहीन्यांमुळे होणारी पाणी गळती यामुळे टंचाईची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेचे मजबुतीकरण आणि विस्तारीकरण करण्याचा निर्णय पाणी पुरवठा विभागाने घेऊन त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला आहे. पुढील १५ वर्षांचा विचार करून ३२३ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला असून यानुसार ठाणे शहर, वागळे इस्टेट, कोपरी, वर्तकनगर, लोकमान्यनगर, कळवा आणि घोडबंदर भागात पाण्याच्या टाक्यांची उभारणीबरोबरच नवीन जलवाहीन्या टाकण्याची कामे करण्यात येणार आहेत.

हेही वाचा… कोंडी कमी करण्याचे श्रेय तुमच्या पुत्राला घेऊ द्या.. पण शिळफाट्याच्या कोंडीचा शिक्का पुसा..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघाचा परिसर असलेल्या वागळे इस्टेट भागात पाणी साठवणुकीसाठी पुरेसे जलकुंभ नाहीत. वाढत्या नागरिकरणाच्या तुलनेत आहेत, ते जलकुंभ अपुरे पडत आहेत. यामुळे याठिकाणी टंचाईची समस्या निर्माण होते. ही समस्या सोडविण्यासाठी पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेचे मजबुतीकरण आणि विस्तारीकरण योजनेंतर्गत दोन जलकुंभाची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी परिसरातील जागा उपलब्ध करून देण्याची मागणी एमआयडीसीकडे केली होती. त्यास एमआयडीसीने नुकताच हिरवा कंदील दाखविल्यानंतर येथे जलकुंभ उभारणीच्या कामाची प्रक्रीया सुरू झाली आहे. या संदर्भात ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला.

हेही वाचा… डोंबिवली फडके, नेहरू रस्त्यांवरील फेरीवाल्यांवर कारवाई, निवारे, मंच, लोखंडी बाकडे तोडून साहित्य जप्त

वागळे इस्टेट भागातील मुख्य रस्त्यालगत एमआयडीसीची खुली जागा असून त्या जागेचे क्षेत्रफळ २६३० चौ.मी इतके आहे. पैकी १८३५ चौ.मी जागा अतिक्रमण विरहित आहे. या जागेत ५ टक्क्यापर्यंत बांधकामे करता येणार असून त्याठिकाणी दोन जलकुंभाची उभारणी करणे शक्य होणार आहे. त्यामुळे एमआयडीसीने ही जागा पालिकेला देण्यासाठी नुकताच हिरवा कंदील दाखविला आहे. याठिकाणी ३० लाख लीटर आणि २२ लाख ५० हजार लीटर इतक्या क्षमतेचे दोन जलकुंभ उभारले जाणार आहेत. या जलकुंभाचा फायदा किसननगर, पडवळनगर, शिवाजीनगर, रतनबाई कंपाऊंड या भागातील हजारो रहिवाशांना होणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane wagle estate water scarcity will solve now soon with two big water tanks asj