अंबरनाथः अंबरनाथ शहराच्या वेशीवरून जाणाऱ्या काटई अंबरनाथ राज्यमार्गावरील आनंदनगर ते टी जंक्शन या अवघ्या एक किलोमीटरच्या पट्ट्यात दोन ठिकाणी अवघ्या काही मीटरचा रस्ता तयार करण्याचे राहिल्याने येथे तासनतास कोंडी होते आहे. पिंकसिटीकडे जाणाऱ्या वळणापासून अवघ्या काही फुटांवर खड्डे पडले आहेत. तर पुढे टी जंक्शन चौकाची चाळण झाली आहे. त्यामुळे येथे वाहनांची कोंडी होते. परिणामी काटईकडून येणारी वाहतूक, बदलापूरकडून येणारी वाहतूक खोळंबते. त्याचा परिणाम कल्याण बदलापूर राज्यमार्गावरही होतो आहे.
काटई अंबरनाथ रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे आणि रूंदीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या मार्गाच्या कॉंक्रिटीकरणामुळे यंदाच्या वर्षात या मार्गावर प्रवास गतीमान झाला. गेल्या काही वर्षात ज्या भागात कोंडी होत होती ती कोंडी फुटली. प्रवास वेगवान झाल्याने प्रवाशांचा त्रासही कमी झाला. त्यामुळे वाहनचालकांना काही अंशी दिलासा मिळतो आहे. मात्र या मार्गावर अजूनही कोंडीची ठिकाणे जैसे थे आहेत. ज्यातील नेवाळी नाका हा सर्वाधिक कोंडीचा परिसर असून येथे उड्डाणपुलाची प्रतिक्षा आहे. मात्र त्यापुढे अंबरनाथच्या टी जंक्शनपर्यंत काही भाग कॉक्रिटीकरणाचे राहिले आहेत. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी वाढली आहे.
या काटई मार्गावर दोन मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. एकीकडे औद्योगिक वसाहती तर दुसरीकडे नागरी वसाहती. त्यामुळे मार्गावर मोठी वाहतूक होत असते. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, तळोजा, पनवेल, पुणे महामार्ग, अटल सेतू या सर्व भागात मार्गक्रमण करण्यासाठी याच मार्गावरून जावे लागते. त्यामुळे येथे मोठी वाहतूक असते. त्यातच अंबरनातच्या पिंकसिटीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काही अंतरावर दोन्ही मार्गिकांवर कॉंक्रिटीकरण अपूर्ण आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. सायंकाळी येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. शनिवारी या भागात अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. सोमवारीही काही काळ वाहने कोंडीत अडकली. पुढे टी जंक्शन परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे बदलापूरकडून येणारी आणि फॉरेस्टनाकाकडे जाणारी वाहतूक आणि काटईकडून येणारी आणि बदलापुरकडे जाणारी वाहतूक येथे मंदावते. त्यामुळे दोन्ही दिशांना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरासाठी पाऊण ते एक तास खर्ची घालावा लागतो आहे. त्यामुळे या खड्ड्यांना बुजवण्याची मागणी होते आहे.
रस्त्याच्या कडेचे वाहन धुलाई दुकाने आवरा
अंबरनाथ ते काटई दरम्यान एमआयडीसीच्या मोठ्या जलवाहिन्यांच्याच शेजारी वसलेले वाहन धुलाई दुकाने निव्वळ योगायोग नाही. या वाहिन्यातून सर्रास पाणीचोरी केली जाते आहे. या दुकानांमध्ये जाणारे वाहनचालक रस्त्यावरच वाहने उभी करत असल्याने रस्त्यावरच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे. त्याचा इतर वाहनांना फटका बसतो आहे. याकडेही एमआयडीसी प्रशासन, वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होते आहे.