रुग्णांना स्वस्त दरात औषधे; ठाणे महापालिकेचा सर्वसाधारण सभेपुढे प्रस्ताव
ठाणे : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या दहा वर्षांपासून बंद असलेले औषधालयाच्या जागेत भाडे तत्त्वावर जेनेरिक औषधालय सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या संबंधीचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनाने तयार करून तो येत्या ३ मार्चच्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला आहे. या प्रस्तावामुळे रुग्णांना ६० ते ७० टक्के कमी दरात औषधे उपलब्ध होणार असून त्याचबरोबर त्यांना औषधांसाठी इतरत्र वणवण फिरावे लागणार नाही, असा दावा पालिका प्रशासनाने प्रस्तावात केला आहे.
ठाणे महापालिकेचे कळवा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज रुगणालय आहे. या रुग्णालयात ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेकडो गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णालयाच्या तळमजल्यावर औषधालयासाठी जागा उपलब्ध आहे. ही जागा पालिका प्रशासनाने निविदा काढून एका संस्थेला भाडेतत्त्वावर दिली होती. या संस्थेने त्याठिकाणी औषधालय सुरू केले होते. परंतु जागा भाडे रक्कमेवरून संस्था आणि पालिकेत वाद झाला होता. हा वाद न्यायालयापर्यंत गेला. न्यायालयात हे प्रकरण निकाली लागताच पालिकेने या ठिकाणी पुन्हा भाडेतत्त्वावर जेनेरिक औषधालय सुरू करण्याचा निर्णय घेऊन त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला आहे.
या प्रस्तावानुसार रुग्णालयाच्या तळमजल्यावर असलेल्या १९९.८८ चौरस मीटर जागेत भाडेतत्त्वावर जेनेरिक औषधालय सुरू केले जाणार आहे. त्यासाठी पालिका संबंधित संस्थेकडून दरमहा ५२ हजार २६२ रुपये याप्रमाणे वार्षिक ६ लाख २७ हजार १४४ रुपये इतके भाडे निश्चित करण्यात आले असून त्यात प्रत्येक वर्षी दहा टक्के वाढ करण्यात येणार आहे. सुरुवातीला तीन वर्षांकरिता ही जागा भाडय़ाने देण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने तीन-तीन वर्षांची मुदत वाढ देण्याचेही प्रस्तावात म्हटले आहे.
६० ते ७० टक्के कमी दर
कळवा रुग्णालयात गेल्या दहा वर्षांपासून औषधालय बंद आहे. यामुळे रुग्णालयाकडून मिळणाऱ्या औषधांव्यतिरिक्त इतर औषधांसाठी रुग्णांना इतरत्र जावे लागते. यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होते. कित्येक वेळा रुग्णांकडे पैसे नसल्यामुळे त्यांना औषधे खरेदी करता येत नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या उपचारामध्ये हेळसांड होते आणि त्याचबरोबर रुग्णाच्या नातेवाईकांनाही प्रचंड त्रास होतो. यामुळे रुग्णालयात जेनेरिक औषधालय सुरू केले तर, नागरिकांना रुग्णालयातच ६० ते ७० टक्के कमी दरात औषधे उपलब्ध होतील, असा दावा प्रशासनाने प्रस्तावात केला आहे.