ठाणे – बेकायदेशीर पद्धतीने खासगी सावकार आणि वित्तीय संस्था यांच्या जाचक वसुली आणि अटीच्या विरोधात ठाणे शहरात सोमवारी आंदोलन करण्यात आले. ठाणे रेल्वे स्थानकजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते गावदेवी येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला होता. ‘सहकारातून मदत द्या, सावकारीतून मुक्तता करा’, ‘सावकारीमुक्त समाज आमचा निर्धार’,‘शेतकी, मजूर आणि जनतेस न्याय द्या ’, अशा मजकुराचे फलक आंदोलनकर्त्यांनी हातात घेतले होते.

जुलमी खासगी सावकार आणि वित्त संस्थांकडून बेकायदेशीर होणाऱ्या वसुली कारवाई विरोधात ठाणे येथील महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्यावतीने ठाणे शहरात सोमवारी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे प्रदेशाध्यक्ष प्रसाद करंदीकर यांच्या नेत्तृत्वाखाली करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करत कर्जदार आणि सावकारांच्या अन्यायकारक वागणुकीविरोधात आवाज उठवला. त्यानंतर उपनिबंधक किशोर मांडे यांना निवेदन देण्यात आले. मांडे यांनी मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून “न्याय नक्की मिळेल,” असे आश्वासन दिले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश नेते वाघमारे, लोखंडे, प्रदेश संघटक मधुकर मोरे, माजी जिल्हाध्यक्ष धनाजी सुरोसे, ठाणे जिल्हाप्रमुख सचिन यादव, ठाणे शहरप्रमुख राजेश बामणे, रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हाप्रमुख आबासाहेब चासकर सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बचाटे तसेच ओबीसी पँथरचे महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी सिद्धांत चासकर उपस्थित होते.

या आंदोलनादरम्यान, सचिन यादव आणि राजेश बामणे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना, अन्यायाविरुद्ध लढा अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले. तर, आबासाहेब चासकर आणि धनाजी सुरोसे यांनी शासकीय व्यवस्थेला जाब विचारत प्रशासनाच्या दुर्लक्षावर कठोर टीका केली. या आंदोलनात महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन शांततेत पार पडले असून प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.