ठाणे : शरद पवार हे जर हुकूमशहा आहेत तर त्यांनी स्थापन केलेला पक्ष आणि त्यांनी देशभर पोहचविलेले निवडणूक चिन्ह वापरून निवडणुका लढविण्याची भाषा का करता, असा प्रश्न उपस्थितीत करत हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करून स्वतंत्र निवडणूक चिन्हावर लढून दाखवा, असे खुले आव्हान राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार यांनी बारामतीमध्ये भाषण करताना आपणच निवडणुकीत उभे आहोत, असे समजून मतदान करा, असे आवाहन केले आहे. त्याला आव्हाड यांनी प्रतिउत्तर दिले आहे. निवडणूक आयोगात पात्र- अपात्रतेसंदर्भात लढाई सुरू आहे. त्या अनुषंगानेच अजित पवार गटाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात , शरद पवार यांच्यावर हुकूमशहाचे आरोप केले. शरद पवार हे कुणाचे ऐकत नाहीत. ते सर्व निर्णय एकट्यानेच घेतात, असे आरोप करण्यात आले आहेत. या प्रतिज्ञापत्रावर पहिली सही सुनील तटकरे यांनी केली आहे. ज्या तटकरेंनी पहिली सही केली आहे, त्यांनाच शरद पवार यांनी दोनवेळा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केले होते. मंत्रिपदही दिले होते. त्यांच्या मुलीला आमदारकी आणि मंत्रिमंडळात मानाचे स्थान दिले होते. एवढं सगळं घेऊनही सुनील तटकरे हे शरद पवार यांना हुकूमशहा कसे काय म्हणू शकतात, असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थितीत केला आहे.

हेही वाचा >>> ठाण्यात ‘ग्रँड सेंट्रल पार्क’ ची उभारणी; काश्मीरच्या मुघल गार्डनसह चिनी, मोरोक्कन, जपानी संकल्पनेवर उद्याने

राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे जन्मदाते शरद पवार हेच आहेत. त्यांनीच पक्षाला निवडणूक चिन्ह मिळवून दिले आहे. आता हाच पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेण्याचा प्रयत्न अजित पवार हे करीत आहेत. अजित पवार नेहमीच म्हणत असतात की ते खोटं बोलत नाहीत. मग, त्यांनी खरं सांगावे की त्यांना कोणी घडविले. त्यांचे स्वतःचे योगदान काय आहे, या देशात केवळ दोन -तीनच नेते असे आहेत की त्यांनी बंड करून आपले अस्तित्व टिकवले आहे. त्यामध्ये शरद पवार अग्रस्थानी आहेत. काँग्रेसशी फारकत घेऊन नवीन पक्ष स्थापन केल्यानंतर अवघ्या वर्षभरातच त्यांनी पक्षाला सत्तास्थानी बसवून अजित पवार यांना मानाचे स्थान दिले होते.

हेही वाचा >>> बंदुकीचे सर्वाधिक परवाने ठाणे आणि कल्याण, डोंबिवलीत; बंदूक स्वसंरक्षणासाठी की खोट्या प्रतिष्ठेसाठी ?

शरद पवार यांचे निर्णय लोकाभिमुख होते. पण, अजित पवार यांनी सुप्रमा अर्थात सुधारीत प्रशासकीय मान्यतेच्या नावाने गोंधळ घातला असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनीच केले आहेत, असेही आव्हाड म्हणाले. शरद पवारांवर खोटे आरोप करणाऱ्यांनी जाहीरपणे सांगावे की पवारांच्या घरी सकाळपासूनच जाणारे ते आठजण कोण होते? जेवढी मोकळीक पवार यांनी दिली होती, तेवढी कोणत्याच पक्षात नाही. हीच मोठी चूक झाली. सर्वांना विश्वासात घेणाऱ्या शरद पवार यांचाच विश्वासघात करण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार यांनी आताच नवीन पक्ष नोंदणीसाठी अर्ज करून स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवावी. तेव्हा निर्णय महाराष्ट्रातील जनताच घेईल, असे आव्हानही आव्हाड यांनी दिले आहे.

बापासाठी मरण आले तरी बेहत्तर

अपात्रतेबाबत पत्रकारांनी विचारले असता, निर्णय काय येणार आहे, हे आम्हास माहित आहे. पण, आम्हाला त्याची भीती नाही. ज्या बापाने आम्हाला घडविले. त्या बापापुढे आमदारकी काय महत्वाची. ज्या बापाने आम्हाला घडविले, त्या बापासाठी मरण आले तरी बेहत्तर, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी व्यक्त केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awad challenge to ajit pawar to open own party and contest the election zws