राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याआधी त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका यावरून जोरदार टोले लगावले आहेत. त्यांनी ठाण्यातील काही योजनांच्या उद्घाटन कार्यक्रमाचा उल्लेख करत आता पुन्हा मुख्यमंत्री शिंदेंच्या शेजारी उभा राहिलो तर पोलीस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील, असं खोचक विधान केलं. त्यांनी शनिवारी (३ डिसेंबर) ट्वीट करत आपली मतं मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आज ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचे शुभारंभ आहेत. महापालिकेने मला या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले आहे, पण ब्रिजच्या उद्घाटनात त्यांच्या ८ फूट अंतरावर माझ्यावर ३५४ चा गुन्हा दाखल झाला. ते स्वतः साक्षीदार आहेत.”

हेही वाचा : VIDEO: “मला बरबाद करण्यासाठी रचलेला तो डाव…”, जितेंद्र आव्हाडांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

“…आणि पोलीस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील”

आज त्यांच्या बाजुला उभा राहीन आणि पोलीस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील. त्यापेक्षा कार्यक्रमाला न गेलेलं बरं. परत पोलीस म्हणतील दबाव होता आणि मुख्यमंत्री म्हणतील तुला माहीत आहे ना मी हे करू शकत नाही. तुला कसं कळत नाही. खरंच कळत नाही. चलो ये वक्त भी गुजर जायेगा”, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

याआधी ठाण्यात नेमकं काय झालं होतं?

काही दिवसांपूर्वीच मुंब्रा येथे एका उड्डाणपूलाचे लोकार्पण एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड हेदेखील उपस्थित होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या वाहनाजवळ आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप भाजपाच्या एका महिला पदाधिकारीने केला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना अटकही झाली होती.

दरम्यान शनिवारी ठाणे महापालिका मुख्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण आव्हाड यांनाही देण्यात आले आहे. या कार्यक्रमापूर्वीच आव्हाड यांनी हे ट्वीट केले. त्यांच्या या ट्विटची चर्चा ठाण्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे.

“राज ठाकरे हेच खरे जातीयवादी”

दरम्यान, मतांच्या ध्रुवीकरणासाठी जातीयवाद पसरवणारा राज ठाकरे हाच एकमेव माणूस आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी शुक्रवारी (२ डिसेंबर) केला होता. काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा कर्तव्य-त्याग सप्ताहाचे उद्घाटन आव्हाड यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाडांनी हा आरोप केला. मशिदींवरील भोंगे उतरविण्याचा परिणाम म्हणून काकड आरत्या बंद झाल्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा : त्या गरिबांना फासावर…” खोटे गुन्हे दाखल केल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाडांचे पुन्हा गंभीर आरोप

जातीतून इतिहासाकडे पाहण्याचे पेव फुटले असून राजकीय स्वार्थासाठी ठरावीक मूठभर लोक असे करत आहेत. अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यासंदर्भात आव्हाड यांनी ते ज्या पुरंदरे यांचे नाव घेतात त्यांनी खोटा इतिहास सांगितला असा आरोप केला. प्रतापराव गुजर यांची कथा काल्पनिक असल्याचे गजानन मेंहेंदळे यांनी सांगितले असल्याचे इतिहासाचे अभ्यासक जयसिंगराव पवार यांनीच स्पष्ट केले आहे. मतांच्या ध्रुवीकरणासाठी भोंगैे बंद करायला गेले. त्याचा फटका ठिकठिकाणच्या काकड आरत्यांना बसला आहे. राज्यपालांसमोर काळे झेंडे दाखविण्याचे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेणे हा कायदा आहे. त्यातून सुटका होईलही. पण, महाराष्ट्राच्या बापाचा अपमान होतो तो कसा विसरता येईल, असा सवाल आव्हाड यांनी केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad criticize cm eknath shinde over fir filed against him in past pbs
First published on: 03-12-2022 at 12:22 IST