ठाणे: ठाण्यात सध्या क्लस्टर या नावाचे भूत सर्वांच्या डोक्यावर ठेवून गरिबांना उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. मी एसआरएचे काम पाहत असताना, गरिबांची घरे उद्ध्वस्त केली नाहीत आणि बिल्डरांचा आधार घेऊन एसआरए चालवला नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. नळपाडा येथील एसआरए प्रकल्पात होत असलेली फसवणूक आणि अन्याया विरोधात उमेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली नागरिक आज, रविवारी रस्त्यावर उतरले होते. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी याठिकाणी भेट देऊन नागरिकांना दिलासा दिला.

ठाण्यात सध्या नविन दादागिरी सुरु आहे. ही घरे आपल्या पूर्वजांनी मेहनतीने घेतलेली आहेत, ती कोणाच्या बापाची नाहीत.प्रेमाने मागितले तर जीव देऊ, पण दादागिरीने मागितले तर जीवही घेऊ. एसआरएला जोपर्यंत रहिवाशी मंजूरी देत नाही तोपर्यंत त्याला कोणीही हात लावू शकत नाही, अशा शब्दात आव्हाड यांनी इशारा दिला. तुम्ही लोक निवडणूकीत स्वत:ला १००-५०० रुपयांना विकले जातात. तुम्हालाही माहित नसते की, पुढचे पाच वर्षासाठी तुम्ही स्वत:ला विकलेले असतात. मग तोच नगरसेवक तुमचा बाप बनून जातो. तेव्हा तुमच काही ऐकलं जात नाही. जर तुम्ही तुमचे मत विकले नाही तर, ही परिस्थिती तुम्हाला नेहमीच सोसावी लागेल. मी तुमची लढाई लढण्यासाठी आलो आहे. जिथे कुठे गरिबांचा प्रश्न उभा राहतो, तिथे मी नक्की उभा राहणार, कारण मी स्वतः गरिबी पाहिली आहे, असेही यावेळी ते म्हणाले.

या सरकारची गरिबांना बेघर करण्याची इच्छा आहे का ? या सरकारला तुम्ही मत आणि निवडून यासाठी दिले आहे का ? जेवढ्या पण घरांवर सर्वे नंबर पडले आहे. त्यासर्व नंबर वर रंग मारुन ते पुसून टाका. मी पोलिसांना सांगतो, आम्हाला याठिकाणी सर्वे करुन द्यायचा नाही, आम्हाला जबरदस्ती करु नका असा इशारा देखील आव्हाड यांनी दिला. मला याठिकाणी निवडणूक लढायची नाही किंवा मला याठिकाणी मतांसाठी भीक सुद्धा मागायची नाही. पण, जर याठिकाणी अन्याय होत असेल तर, मी डॉ भीमराव आंबेडकरांचा मुलगा आहे. त्यामुळे या अन्याया विरोधात उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.