ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय भूमिका घेऊन माझ्या मतदार संघातील विकासकामांचे प्रस्ताव कधीच अडविले नाहीत. पण, तेव्हाचे एकनाथ शिंदे वेगळे होते, आता त्यावर मला काही बोलायचे नाही, असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे मला हरविण्यासाठी काय करतात, हे मला राज्याला सांगायचे होते आणि ते माझे सांगून झालो असल्याचेही म्हणाले.

पारसिक- मुंब्रा येथे रेतीबंदर खाडीकिनारी चार किमी लांबीच्या ४२ एकर जागेवर सिंगापूर आणि साबरमतीच्या धर्तीवर चौपाटी उभारण्यात येत आहे. खाडीवर चालण्यासाठी देशातील पहिला तरंगता मार्ग, थीम पार्क, अ‍ॅम्फी थिएटर, बोटींग, क्रीडा व मनोरंजनाची अद्ययावत साधने यासह जवळपास १८ अत्याधुनिक सुविधा रेतीबंदर चौपाटीवर उभ्या केल्या जात आहेत. या चौपाटीचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुढील दोन ते तीन महिन्यांत या चौपाटीचे काम पूर्णत्वास येणार आहे. या प्रकल्पाच्या कामाची माहिती देत असताना आव्हाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक केले. २००९ मध्ये पारसिक चौपाटीचे स्वप्न पाहिले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी ही चौपाटी उभी करण्यासाठी येथील अतिक्रमणे हटविली होती. यामुळे येथील भूमाफियांनी २५ कोटी खर्च करून जोशी यांची बदली केली, असा दावा करत त्यानंतर ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी चौपाटीचे काम मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले..

हेही वाचा…भुजबळ-पवार भेट म्हणजे प्रगल्भ राजकीय संस्कृतीच दर्शन, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

माझ्या मतदारसंघासाठी यापूर्वी कधीही निधीची कमतरता भासत नव्हती. प्रस्ताव मांडला की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लगेच निधी देत होते. २०१७ ते २०२१ दरम्यान एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कधीही आपला विकासनिधी थांबविला नाही. यापूर्वी ठाण्यात निधीचे राजकारण कधीच झाले नव्हते. ते आता सुरू झाले आहे. तेव्हाचे एकनाथ शिंदे हे वेगळे होते, मात्र आता त्यावर मला काही बोलायचे नाही, असेही ते म्हणाले. मोठ्या प्रमाणात निधी आणून आपण कळवा, मुंब्य्राचा विकास केला, हा विकास करीत असतांना कधीही स्वप्ने दाखविली नाही, ती सत्यात उतरविण्याचे काम केले, अशी टिकाही त्यांनी अजित पवार गटावर केली. राजकीय वैर हा वैचारिक असतो. तो वैयक्तिक नसतो. पण, आजकाल तसे घडताना दिसत आहे. आता मला राज्याच्या अर्थ नियोजन विभागाकडून निधीच नको. कारण, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मला हरविण्यासाठी काय करतात, हे मला राज्याला सांगायचे होते आणि ते माझे सांगून झाले आहे, असे आव्हाड यांनी सांगितले.