कल्याण : कल्याण शहराच्या बाजारपेठ आणि खडकपाडा भागात अंमली पदार्थ विरोधी विशेष कारवाई पथक आणि खडकपाडा पोलिसांनी दोन दिवसापूर्वी केलेल्या दोन वेगळ्या कारवायांमध्ये २२ लाख २५ हजार रूपयांचा गांजा आणि मेफेड्रोन पावडर जप्त केली. याप्रकरणी तीन अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या इसमांना अटक केली आहे.
विशेष म्हणजे अंमली पदार्थांची तस्करी करणारे कल्याण मधील रहिवासी आहेत. बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत मोहम्मद कैफ मन्सूर शेख (२४) याला अटक करण्यात आली आहे. तो बैलबाजारातील मेहेक मंजीलमधील रहिवासी आहे. फरदीन आसिफ शेख (२४) हा भिवंडी कोनमधील रहिवासी आहे. तो ड्रीम काॅम्पलेक्समध्ये राहतो. त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी पोलीस उपायुक्तांचे विशेष कारवाई पथक कल्याण मधील बैलबाजार भागातील फोर्टिस रुग्णालय गल्ली ते बाजार समिती आवार भागात गस्त घालत होते. तेथे त्यांना मोहम्मद आणि फरदीन संशयास्पद हालचाली करत असल्याचे आढळले.
पोलिसांनी त्यांना थांबून त्यांची झडती घेतली. त्यांच्याकडे २२ लाख रूपये किमतीची मेफेड्रोन पावडर आढळून आली.पोलिसांनी त्यांच्यावर बाजारपेठ पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ तस्करी कायद्याने गुन्हा दाखल केला. त्यांना अटक केली.कल्याणमधील बैलबाजार परिसरातील बाजार समिती भाग हा अंमली पदार्थ तस्करांचा अड्डा झाला आहे. गेल्या वर्षभरात याच भागातून पोलिसांनी अनेक अंमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे.
खडकपाडा पोलिसांचे पथक गुरूवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या दरम्यान वालधुनी खडकापाडा भागातील योगीधाम, साई दर्शन ढाबा परिसरात गस्त घालत होते. ही गस्त सुरू असताना या भागात निर्जन ठिकाणी रवी शिवाजी गवळी (३०) हा इसम फिरत होता. तो अनुपनगर भागात राहतो. पोलिसांनी त्याला या परिसरात काय करतो अशी विचारणा केली. तो पोलिसांना समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. म्हणून पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याजवळ २५ हजार रूपये किमतीचा ११२० ग्रॅम गांजा आढळून आला.
हा गांजा त्याने कोठुन आणला. तो गांजा तो कुठे विकणार होता. याविषयीची माहिती पोलिसांनी विचारण्यास सुरूवात केली. त्यावेळी तो गडबडून गेला. रवी गवळी हा गांजाचा तस्कर असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी त्याला खडकपाडा पोलीस ठाण्यात नेले. त्याच्यावर अंमली पदार्थ तस्करी कायद्याने गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये मागील वर्षभरापासून पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक कडक केली आहे. कल्याण, डोंबिवली शहरे नशामुक्त करण्याचे अभियान सुरू केले आहे. अशाही परिस्थितीत अंमली पदार्थ तस्कर शहरात विविध मार्गाने गुपचूप तस्करी करत असल्याने पोलिसांनी या तस्करांभोवतीचे फास अधिक आवळण्यास सुरूवात केली आहे.