कल्याण : कल्याण शहराचा आणि कल्याण शहरा लगतच्या ग्रामीण भागाचा पाणी पुरवठा मंगळवारी (ता. २८) बारावे आणि मोहिली येथील कच्चे पाणी उचलण्याच्या यांत्रिक मार्गिकेतील गाळ काढण्याच्या कामासाठी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. या पाणी पुरवठा बंदमुळे कल्याण पूर्व आणि पश्चिम, तसेच कल्याण शहरा लगतच्या ग्रामीण भागातील वडवली, शहाड, टिटवाळा, मांडा परिसराला मंगळवारी कल्याण डोंबिवली पालिकेकडून पाणी पुरवठा होणार नाही.
बारावे आणि मोहिली येथील उदंचन आणि जलशुध्दीकरण केंद्रात उल्हास नदीतून पाणी उचलले जाते. हे पाणी उचलताना नदी पात्रातून वाहून येणारा पालापाचोळा, डोंगर-दऱ्यातून वाहून येणारी माती नदी पात्रातून पालिकेच्या पाणी उचलण्याच्या मोहिली, बारावे येथील यंत्रणेत अडकते. ही यंत्रणा वेळच्या वेळी साफ केली नाही तर उदंचन केंद्राजवळील यंत्रणा नादुरुस्त होऊन पाणी पुरवठा उचलण्या अडथळे येतात.
गेल्या पाच महिन्याच्या काळात यंत्रणेत अडकलेला गाळ, माती काढण्यासाठी पालिकेने आठ ते दहा वेळा पाणी पुरवठा बंद ठेऊन ही कामे पूर्ण केली आहेत. आता पावसाचे प्रमाण कमी झाल्याने गेल्या महिनाभराच्या कालावधीत वाहून आलेला गाळ, माती, पालापाचोळा कच्चे पाणी उचलण्याच्या मार्गिकेतून काढण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे पालिकेने हे काम येत्या मंगळवारी करण्याचे नियोजन केले आहे. हे यांत्रिक काम पूर्ण करण्यासाठी नऊ तास लागणार आहेत. या उदंचन केंद्रातून होणारा पाणी पुरवठा त्यामुळे बंद ठेवण्यात येणार आहे, असे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्याने सांगितले.
या कालावधीत विद्युत उपकरणांचीही देखभाल केली जाणार आहे. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी, चिंचपाडा, कैलासनगर, वालधुनी, विजयनगर, नेतिवली, चक्कीनाका, पत्रीपूल, लोकग्राम, कल्याण पश्चिमेतील मुरबाड रस्ता, बेतुरकरपाडा, बिर्ला महाविद्यालय परिसर, खडकपाडा, पारनाका, दूधनाका, गोविंदवाडी, आधारवाडी, गंधारे, बारावे, शहाड, आंबिवली, मोहने, धाकटे शहाड, बंदरपाडा, अटाळी परिसराचा मंगळवारी बंद राहणार आहे. नऊ तासाच्या पाणी पुरवठा बंदमुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा घरात करून ठेवावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे. एमआयडीसीकडून कल्याण, डोंबिवली शहरांच्या परिसराला होणारा पाणी पुरवठा मात्र सुरळीत राहणार आहे.
