कल्याण – कल्याण शहरातील शहाड येथील उड्डाण पुलाच्या देखभाल दुरुस्ती, मजबुतीकरण आणि बेअरिंग बदलण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून २८ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत केले जाणार आहे. या महत्वपूर्ण कामासाठी शहाड येथील उड्डाण पूल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी १५ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. या पुलावरून धावणाऱ्या कल्याण-माळशेजमार्गे नगर आणि इतर सर्व प्रकारच्या वाहन चालकांनी पर्यायी रस्ते मार्गाने वाहतूक करावी, अशी अधिसूचना वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी काढली आहे.
शहाड येथील उड्डाण पुलावर खूप खड्डे पडले आहेत. पुलाचे सांधे जोड खराब झाल्याने पावसाचे पाणी त्यात मुरून पुलाला गळती लागली आहे. पुलावरील रस्ता सुस्थितीत नसल्याने पुलावर दररोज वाहतूक कोंडी असते. कल्याणहून मुरबाडमार्गे माळशेज, अहिल्यानगर, जुन्नर भागात जाणारी आणि येणारी वाहतूक या पुलावरून होते. कल्याण तालुक्यातील म्हारळ ते मुरबाड तालुका हद्दीतील गावांमधील नोकरदार, व्यावसायिक, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत जुन्नर, आळेफाटा भागातून भाजीपाला, फळे घेऊन येणारी वाहने याच पुलावरून धावतात. दुरुस्तीच्या काळात या वाहनांना पर्यायी रस्ते मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. पर्यायी रस्ते मार्गावरून अवजड, जड वाहनांना सकाळी सहा ते सकाळी ११ आणि संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रवेश बंद राहणार आहे.
प्रवेश बंद व पर्यायी मार्ग
मुरबाड, माळशेज घाटाकडून शहाड उड्डाण पुलाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बारवी डॅम फाटा, मुरबाड येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही सर्व वाहने बारवी डॅम फाटा येथून बदलापूर रस्त्याने बदलापूर, पालेगाव, नेवाळी नाका, मलंग गड रस्ता, लोढा पलावा, शीळ डायघर, किंवा पत्रीपूल येथून इच्छित स्थळी जातील. मुरबाड तालुक्यातून शहाड पुलाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दहागाव फाटा (रायता गाव) येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने रायतागाव येथे डावे वळण घेऊन वाहोली गाव, मांजर्ली, दहागाव, एरंजाड, बदलापूर, पालेगाव, नेवाळी नाका, शिळ डायघर किंवा पत्रीपूल येथून इच्छित स्थळी जातील.
कल्याण, भिवंडी, ठाणेकडून शहाड पुलावरून मुरबाड, माळशेज घाटकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दुर्गाडी पूल येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही सर्व वाहने दुर्गाडी पूल येथे उजवे वळण घेऊन गोविंदवाडी वळण रस्ता, पत्रीपूल, चक्कीनाका, नेवाळी नाका, पालेगाव, बदलापूर मार्गे मुरबाडकडे जातील. अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना यामधून सूट देण्यात आली आहे.