कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या शाळांमधील सुमारे अडीच हजार विद्यार्थी अद्याप गणवेश, रेनकोट आणि इतर शालेय साहित्याच्या प्रतीक्षेत आहेत. आपल्या मुलांना शालेय साहित्य कधी मिळेल या प्रतीक्षेत पालक आहेत. विद्यार्थीही शाळा सुरू झाल्यापासून गणवेश, रेनकोट आणि इतर शालेय साहित्य न मिळाल्याने हिरमुसले आहेत.
कल्याण डोंबिवली पालिका शिक्षण मंडळाच्या अखत्यारित ६१ शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण सुमारे साडे आठ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. आतापर्यंत पालिकेच्या शिक्षण विभागाने सहा हजार विद्यार्थ्यांना गणवेश, रेनकोट आणि इतर शालेय साहित्याचे वाटप केले आहे. शालेय साहित्यापासून वंचित असलेली काही मुले ही झोपडपट्टी, शहराच्या परीघ क्षेत्रावरील शाळांमधील आहेत.
काही विद्यार्थी नवीन गणवेश नसल्याने मागील वर्षीचा गणवेश घालून शाळेत येत आहेत. काही पालक आमच्या मुलांना पालिकेकडून गणवेश, रेनकोट, चपला साहित्य कधी मिळणार म्हणून शिक्षकांकडे विचारणा करण्यासाठी येतात. या पालकांना उत्तरे देताना शिक्षकांची दमछाक होत आहे. पाऊस संपत आला तरी रेनकोट मिळाला नसल्याने पालक नाराजी व्यक्त करत आहेत.
विद्यार्थ्यांच्या मापाप्रमाणे त्यांना गणवेश मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची मापे घेऊन त्यांना गणवेश शिवून देण्याचे काम पालिकेने ठेकेदाराला दिले आहे. एकावेळी साडे आठ हजार विद्यार्थ्यांचे गणवेश शिवून मिळण्यात विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात विलंब होत आहे. तरीही लवकरात लवकर हे गणवेश देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती पालिका शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी दिली.
पालकांनी मुलांसाठी गणवेश खरेदी करून त्याची पावती शाळेत जमा केली की त्या विद्यार्थी, पालकांच्या बँक खात्यावर थेट रक्कम जमा करण्यात येत आहे. अशाप्रकारे बाजारातून गणवेश खरेदी करून त्याची पावती जमा करणाऱ्या ९५० पालकांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले आहेत.
काही पालक हे कष्टकरी, मजूर वर्गातील आहेत. अशा पालकांचे बँकेत खाते नाही. त्यामुळे अशा पालकांनी थेट गणवेश खरेदी केले असतील तर त्यांच्यासाठी काही बँकाबरोबर विशेष सुविधेतून पैसे जमा करण्याची चर्चा करण्यात आली आहे. एकही विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. पुढील वर्षी विद्यार्थ्यांचा परीक्षेचा निकाल लागल्यानंतर शालेय साहित्य देता येईल या दृष्टीने यंदा लवकरच नियोजन केले जाणार आहे, असे उपायुक्त जाधव यांनी सांगितले.
सहा हजार विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना गणवेश लवकरच दिले जातील. शिवणकामाला होत असलेला उशीर याचे कारण आहे. काही पालकांची बँकेत खाती नाहीत त्याही अडचणी आहे. पुढील वर्षी लवकरच शालेय साहित्य विद्यार्थ्यांना देण्याचे नियोजन आहे. – संजय जाधव, उपायुक्त, शिक्षण विभाग.