कल्याण – कल्याण पूर्व कोळसेवाडी वाहतूक विभागाच्या अंतर्गत वाहतूक पोलीस चक्कीनाका परिसरातील रस्त्यावर शुक्रवारी वाहतूक नियोजनाचे काम करत होते. यावेळी हेल्मेट न घातलेल्या, मोटारीतील पट्टा न घातलेल्या चालकांवर कारवाई सुरू होती. या कारवाईच्यावेळी हेल्मेट न घातलेला, वाहनावर क्रमांक नसलेल्या एक दुचाकी स्वाराला एका वाहतूक पोलिसाने अडविले. त्याने थांबण्यास नकार देऊन उलट वाहतूक पोलिसाला उलटसुलट प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. वाहतूक पोलिसाने अडविल्याच्या रागातून या दुचाकी स्वाराने मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर रस्त्याच्या मध्यभागी आपली दुचाकी आडवी करून ठेवली आणि रस्त्यावर वाहन कोंडी केली.
या तरूणाच्या या गैरवर्तनामुळे कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वाहतूक हवालदार दहाय यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी स्वार संजय देवीप्रसाद पाल या दुचाकी स्वारा विरुध्द सरकारी कामात अडथळा आणला असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी सांगितले, गुरूवारी कोळसेवाडी वाहतूक विभागाचे हवालदार दहाय आणि वाहतूक सेवक कल्याण पूर्वेतील चक्कीनाका या वर्दळीच्या रस्त्यावर वाहतूक नियोजनाचे काम करत होते. वाहतूक नियोजनाचे काम हवालदार करत असताना एक दुचाकी स्वार हेल्मेट न घालता आणि त्याच्या वाहनाच्या पाठीमागील पुढील बाजुला वाहन क्रमांक नसताना दुचाकी चालवित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हवालदार दहाय यांनी संजय पाल या दुचाकी स्वाराला थांबण्याचा इशारा केला.
आपण हेल्मेट घातलेले नाही. आपल्या दुचाकीच्या पाठीमागील आणि पुढील बाजुला वाहन क्रमांक नसल्याचे पाल यांच्या निदर्शनास आणले. आपल्या वाहनाची सर्व कागदपत्रे, वाहनाची विमा कागदपत्रे पाल यांच्याकडे मागितली. आपण विशेष व्यक्ति असल्याचा दावा करून संजय पाल यांनी उलट वाहतूक हवालदाराला उलटसुलट प्रश्न करून त्यांच्यावर अरेरावी सुरू केली. आपण मला रोखलेच कसे, असे प्रश्न करत पाल वाहतूक पोलिसांना उलटसुलट बोलू लागले. इतर वाहन चालक, पादचारी संजय यांना शांत राहून निघून जाण्याचा सल्ला देत होते. ते मोठ्या आवाजात हवालदाराबरोबर वाद घालत होते.
हवालदाराने अडविले या रागातून संजय पाल यांनी ताब्यातील दुचाकी मुख्य वर्दळीच्या रस्त्यात मध्यभागी उभी करून हॅन्डल लाॅक करून उभी केली. जोपर्यंत तुम्ही मला सोडत नाहीत तोपर्यंत दुचाकी रस्त्याच्या बाजुला करणार नाही अशी ताठर भूमिका घेतली. चक्कीनाका भागात या दुचाकीमुळे वाहतूक कोंडी झाली. चक्कीनाका भागात पाल यांच्या दुचाकीमुळे कोंडी वाढू लागल्यावर वाहतूक पोलिसांनी लाॅक केलेली दुचाकी ओढत रस्त्याच्या बाजुला नेऊन उभी केली आणि या भागातील वाहतूक सुरळीत केली.
वाहतूक पोलिसांनी संजय पाल यांना कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांनी स्वताचा नाव, पत्ता काही स्पष्ट सांगितले नाही, असे सांडभोर यांनी सांगितले. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा पाल यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.