कल्याण : कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात मागील १५ वर्षात आमदार गणपत गायकवाड यांनी विकासाची कोणतीही कामे केली नाहीत. विविध प्रकारच्या नागरी सुविधा ते मतदार संघातील नागरिकांना देऊ शकले नाहीत, अशी टीका करत शिवसेनेचे कल्याण पूर्व भागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी आ. गायकवाड यांचे कर्तृत्व एकदम शून्य आणि ते फक्त पोपटपंची करत बसतात. लोकांना भुलभुलय्या दाखवितात, अशी टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण पूर्व भागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या संतोषनगर प्रभागातील कार्यालया समोरील रस्त्यावरील एका भुयारी गटाराचे झाकण तुटले होते. अनेक दिवसांपासून हे झाकण तुटले असल्याने आणि ते दुरुस्त केले जात नसल्याने याठिकाणी अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे हे तुटलेले झाकण बसवून सुस्थितीत करण्याचे काम आपण केल्याची माहिती भाजप आ. गणपत गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना दिली. आपण स्वता तुटलेले झाकण कामगारांना बोलावून आणून दुरुस्त करुन घेतले. आपण स्वता त्या दुरुस्तीच्यावेळी तेथे उपस्थित होतो, अशी परिस्थिती असताना आपल्या कामाचे श्रेय आ. गायकवाड यांनी घेतले. त्याचा राग माजी नगरसेवक महेश गायकवाड यांना आला.

हेही वाचा : ठाणे खाडीतील बोटीमध्ये स्फोटकं आढळल्याने खळबळ; १६ जिलेटीन कांड्या आणि १७ डिटोनेटरचा साठा जप्त

आ. गणपत गायकवाड यांनी आपल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याच्या विषयावर प्रतिक्रिया देताना महेश गायकवाड यांनी सांगितले, आपण केलेल्या कामाचे श्रेय आमदार गायकवाड कोणतेही सबळ कारण न देता घेत असतील तर ते खूप लाजीरवाणे आहे. भुयारी गटाराचे तुटलेले झाकण बसून घेण्यासाठी आपण स्वता कामगारांना आणले. ते काम गुणवत्तापूर्ण व्हावे म्हणून स्वता तेथे उपस्थित राहून ते काम पूर्ण करून घेतले. ते काम आपण केल्याचे आ. गायकवाड सांगत असतील तर ते खूप दुर्देवी आहे.

हेही वाचा : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी खंडणीची मागणी; काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षासह पाचजणांविरोधात गुन्हा

मागील १५ वर्षात आ. गायकवाड यांनी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यांनी लोकांना मैदान, उद्यान, बगिचे अन्य इतर नागरी सुविधा दिल्या नाहीत. ते फक्त लोकांना स्वप्न दाखवत राहिले. त्यांची कामगिरी कर्तृत्व शून्य आहे. ते फक्त पोपटपंची करुन लोकांना भुलवत असतात. विकास कामे केल्याची फेकाफेकी करत असतात, अशी टीका माजी नगरसेवक गायकवाड यांनी केली आहे. आ. गायकवाड यांनी आपण विकास कामे केल्याचा कितीही दावा केला तरी आता लोक सुज्ञ आहेत. त्यांना कामे कोणी केली हे चांगले माहिती आहे, असे महेश गायकवाड यांनी सांगितले. विधानसभा निवडणुका जवळ येतील त्यावेळी दोन्ही गायकवाडांमधील जुगलबंदी अधिक रंगण्याची चिन्हे आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan mla ganpat gaikwad criticised by former corporator of shinde faction mahesh gaikwad css