ठाणे : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर ठाणे खाडीतील दिवा-आलिमघर भागातील कांदळवनामध्ये मंगळवारी दोन संशयास्पद बोटी महसुल विभागाला सापडल्या असून त्यातून १६ जिलेटीन कांड्या आणि १७ डिटोनेटरचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या स्फोटकांच्या माध्यमातून घातपात घडविण्याचा उद्देश होता का, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, याप्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाणे खाडीत बेकायदा रेती उपसा करण्यात येतो. या माफियांवर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येते. अशाचप्रकारची कारवाई महसुल विभागाकडून मंगळवारी सुरू होती. या कारवाईदरम्यान दिवा-आलिमघर येथील कांदळवनामध्ये पथकाला दोन संशयास्पद बोटी सापडल्या. या बोटी पथकाने ताब्यात घेतल्या असून त्यात १६ जिलेटीन कांड्या आणि १७ डिटोनेटर आढळून आला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही बोटी पथकाने मुंब्रा रेतीबंदर किनाऱ्यावर आणल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच कळवा पोलिसांसह गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. याशिवाय, ठाणे दहशतवाद विरोधी पथकाने घटनास्थळी पोहचून स्फोटकांची पाहणी केली. पोलिसांनी या बोटींमधून स्फोटके जप्त केली आहेत. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. गणेशोत्सवाच्या तोंडावर ही स्फोटके सापडल्याने पोलिस यंत्रणाही सतर्क झाली असून या स्फोटकांच्या माध्यमातून घातपात घडविण्याचा उद्देश होता का, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तसेच मासेमारीसाठी स्फोटकांचा वापर होत होता का, याचाही पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा >>>वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी खंडणीची मागणी; काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षासह पाचजणांविरोधात गुन्हा
ठाणे खाडीमध्ये मासेमारीसाठी जिलेटिन आणि डिटोनेटरचा वापर होत असल्याची माहिती महसुल विभागाने पोलिस यंत्रणाला दिली होती. वारंवार माहिती देऊनही कारवाई होत नव्हती, अशी माहिती महसुल विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. खाडी भागातून गॅसवाहिन्या, रेल्वे मार्गिका तसेच उड्डाण पुल जातात. मासेमारीसाठी होणाऱ्या स्फोटामुळे गॅसवाहिन्या, रेल्वे मार्गिका तसेच उड्डाण पुलांना धोका निर्माण होऊन मोठी दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे.