Kalyan Murbad Road Traffic Jam News- कल्याण शहर अलीकडे दररोज सकाळी सात ते रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडीने गजबजलेले असते. या कोंडीत शहरातील मुख्य वर्दळीचे रस्ते अडकत असल्याने प्रवाशांचा वाहनात बसण्याचा संयम सुटला आहे. शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान कल्याण रेल्वे स्थानक ते मुरबाड रस्त्याची एक बाजू वाहनांनी जाम झाली होती. दुसरी बाजू मोकळी असल्याने अनेक वाहन चालकांनी उलट मार्गिकेतून वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न केल्याने दुसरी मार्गिका कोंडीने गजबजून गेली.

देवीच्या उत्सवानिमित्त नागरिक देवी दर्शनासाठी शहराच्या विविध भागात, घरातील घटांच्या दर्शनासाठी दुपारच्या वेळेत कल्याण शहरात वाहतूक कोंडी नसेल या विचाराने घराबाहेर कुटुंबासह बाहेर पडत आहेत. दुपारच्या वेळेतही वाहतूक कोंडीचा तडाखा बसत असल्याने आता शहरातून कोणत्या वेळेत वाहने चालवावीत या विवंचनेत कल्याण शहरातील नागरिक आहेत.

शनिवारी दुपारी कल्याण शहरातील मुरबाड रस्ता, शासकीय विश्राम गृह रस्ता ते शहाडपर्यंत कोंडीने जाम झाला. वाहने एक तास जागोजागी खोळंबून होती. शहाड उड्डाण पूल, वालधुनी पूल, डाॅ. आंबेडकर चौक, सम्राट चौक आणि इतर भागात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे कल्याण शहरात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त किरण बालवडकर यांनी पालिका प्रशासनाला पत्र दिले आहे. आणि शहरातील खड्डे, रस्ते सुस्थितीत करण्याची मागणी केली आहे.

लालचौकी, दुर्गाडी किल्ला भागातून येणारी वाहने संतोषी माता रस्त्याने रामबाग गल्ल्यांमधून मुरबाड रस्त्याला छेद देऊन डाॅ. म्हसकर रुग्णालय येऊन बाईच्या पुतळ्याकडून उल्हासनगरकडे जातात. ही उलटमार्गी वाहने संतोषी माता रस्त्याने मुरबाड रस्त्यावरून जातात. या छेद रस्त्यामुळे मुरबाड रस्ता रामबाग परिसरात दररोज कोंडीत असतो. शिवाजी चौक भागात दिवस, रात्र कोंडी असते. दुर्गाडी किल्ला येथे देवीचा उत्सव सुरू आहे. या उत्सव आणि या भागातील जत्रेसाठी दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याची एक मार्गिका बंंद करण्यात आली आहे.

कल्याण शहराचा रेल्वे स्थानक, बाजारपेठ, मुख्य वर्दळीचे रस्ते दररोज कोंडीत अडकत असल्याने शालेय विद्यार्थी वाहून नेणाऱ्या बस, नोकरदार वर्गाला या कोंडीचा सर्वाधिक फटका बसत आहे. मुरबाड रस्त्यावर शनिवारी झालेली कोंडी काही वाहने मुरबाड रस्त्यावर रामबाग भागातून आडवी आल्याने आणि या वाहनांना मुरबाड रस्त्यावरील वाहनांनी मार्ग न दिल्याने सर्व वाहने कोंडीत अडकली. या कोंडीमुळे शहरातील व्यापारी, घाऊक वस्तुंचा व्यवसाय करणारा व्यावसायिक कोंडीमुळे वेळेत वाहने योग्य ठिकाणी पोहचत नसल्याने त्रस्त आहे. पालिका अधिकाऱ्यांचा खड्डे भरणी ठेकेदारांवर वचक नाही. काही ठेकेदार कंपन्या या अधिकाऱ्यांच्या असल्याने ही कामे संथगतीने सुरू असल्याची चर्चा आहे.

कल्याण शहरात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. पालिका, वाहतूक विभाग इतर प्रशासन यंत्रणांनी या कोंडीवर लवकर प्रभावी उपाययोजना करावी. अन्यथा या कोंडीने त्रस्त प्रवाशांचा एक दिवस उद्रेक झाल्या शिवाय राहणार नाही. – विजय देशेकर, सामाजिक कार्यकर्ते.

कल्याण शहरातील खड्डे भरणीची कामे सुरू आहेत. ही कामे एका आठवड्यात पूर्ण केली जातील. पावसामुळे ही कामे करताना अडथळे येत आहेत. – जगदीश कोरे, कार्यकारी अभियंता,
कल्याण.