कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातील साधना हाॅटेल ते आर्चिस गृहसंकुल, ओक बाग ते बस आगार दरम्यानच्या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजुला विविध भागातील नागरिक आपली खासगी वाहने आणून उभी करत आहेत. हे रस्ते अरूंद असल्याने एखादे मोठे वाहन या भागात आले की या भागात वाहतूक कोंडी होते. शाळेच्या बस या कोंडीत अडकल्या की मुलांचे हाल होतात, अशा तक्रारी आर्चिस संकुल भागातील नागरिक, व्यापाऱ्यांनी केल्या.

या भागातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या करण्यात आलेल्या वाहन मालकांवर कारवाई करण्याची मागणी वाहतूक पोलिसांकडे केली. वाहतूक पोलिसांनी काही दिवस या भागात गस्त घातली. पण, संबंधित वाहन चालक आपले ऐकत नसल्याची धक्कादायक उत्तरे वाहतूक पोलिसांनी स्थानिक रहिवाशांना दिली. एखादे वाहन नियमबाह्यपणे दररोज रस्त्याच्या कडेला उभे करून ते वाहतुकीला अडथळा ठरत असेल तर त्या वाहनावर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक आणि आरटीओच्या साहाय्याने जप्तीची कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे. तसे अधिकार आरटीओ आणि वाहतूक विभागाला आहेत. डोंबिवलीत अशा कारवाया नियमितपणे सुरू आहेत.

ही वाहने अनेक दिवस एकाच जागी उभी राहत असल्याने दररोज या भागात स्वच्छता करण्यासाठी येणाऱ्या पालिकेच्या सफाई कामगारांना या भागात दररोज स्वच्छता करता येत नाही. वारा आला की या वाहनांखालील कचरा उडून रस्त्यावर येतो. भटके श्वान या वाहनांचा आधार घेऊन या भागात तळ ठोकतात. रात्रीच्या वेळेत हे भटके श्वान पादचाऱ्यांच्या अंगावर, दुचाकी स्वारांच्या पाठीमागे धावतात, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.

कल्याण पश्चिम साधन हाॅटेल ते आर्चिस इमारत, बस आगार परिसर ते झुंझारराव मार्केट हा बाजारपेठेचा भाग आहे. या भागात मालवाहू वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे या भागातील रस्ते मोकळे असावेत अशी या भागातील व्यापाऱ्यांची मागणी आहे. एखादे अवजड मालवाहू वाहन या भागात आले की रस्त्याच्या दुतर्फा वाहनांमुळे त्या वाहन चालकाला वाहन पुढे, मागे नेता येत नाही. माल वेळेत वाहनातून उतरून घेता येत नाही. वाहतूक पोलिसांनी एस. टी. बस आगार परिसरातील आर्चिस इमारत परिसरातील चारही बाजुचे रस्ते, बाजारपेठेतील रस्त्यांवर नियमबाह्यपणे उभे केलेल्या मोटार, दुचाकी, रिक्षा, टेम्पो यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या भागातील नागरिक, व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.