कल्याण – नववर्षानिमित्त अनेक दुकानदार, खासगी आस्थापनांनी आपल्या दुकान, आस्थापनांसमोरील झाडांवर विद्युत रोषणाई केली आहे. झाडांवर विद्युत रोषणाई करू नये, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. तरीही काही व्यावसायिक त्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत. अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा इशारा कल्याण डोंबिवली पालिकेचे उपायुक्त आणि उद्यान विभागाचे मुख्य अधीक्षक संजय जाधव यांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कल्याण, डोंबिवली शहरातील अनेक दुकानदारांनी आपली दुकाने सजवली आहेत. ही दुकाने सजविताना दुकान समोरील झाडांवर, झाडाच्या खोडावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अशाप्रकारे झाडांवर विद्युत रोषणाई केल्याने झाडांवरील जैवविविधतेला धोका पोहचतो. या झाडांवर अधिवास करणाऱ्या पक्षी, इतर जीवांच्या निवाऱ्यावर त्याचा परिणाम होतो. मुंबई उच्च न्यायालयाने अशाच एका प्रकरणाशी निगडित एका जनहित याचिकेवर निर्णय देताना झाडांना विद्युत रोषणाई करण्यास प्रतिबंध केला आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीत गोळवली येथील महारेरा प्रकरणातील बेकायदा इमारतीवर शुक्रवारी कारवाई

न्यायालयाच्या निर्णयावरून कल्याण डोंबिवली पालिकेने गेल्या आठ महिन्याच्या काळात एक हजारहून अधिक दुकानांसमोरील झाडांना केलेली विद्युत रोषणाई काढून टाकली आहे. ज्या दुकानदार, आस्थापनांना न्यायालयाच्या निर्णयाची माहिती नाही ते अनभिज्ञपणे झाडांना रोषणाई करत आहेत. याविषयी पालिकेकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर उद्यान विभागाकडून संबंधित व्यावसायिकाला ती रोषणाई काढून टाकण्याची तंबी दिली जाते.

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील अनेक हाॅटेल्स, ढाबा मालक, मद्यविक्री दुकाने, कपडे विक्री दुकाने, केशकर्तनालय, शोभेच्या वस्तू विक्री करणाऱ्यांनी दुकानसमोरील झाडांवर विद्युत रोषणाई केली आहे. याविषयी पर्यावरणप्रेमींनी काही व्यावसायिकांना ही कृती करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सूचनेला कोणीही दाद दिली नाही. व्यावसायिकांनी दुकानाला विद्युत रोषणाई केली की ती वर्षभर झाडावरून काढली जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

हेही वाचा >>> जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांचे शासनाला साकडे

नववर्षानिमित्त पालिका हद्दीत अनेक व्यावसायिकांनी झाडांना विद्युत रोषणाई करून वृक्ष प्रदूषित केले आहेत. अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाने मोहीम हाती घेण्याची मागणी पर्यावरणप्रेमी, जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.

झाडांवर विद्युत रोषणाई करू नये यासाठी उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत. ज्या व्यावसायिकांना या आदेशाची माहिती आहे ते अशाप्रकारची विद्युत रोषणाई करण्यास पुढाकार घेत नाहीत. मात्र ज्यांना माहिती नाही ते अशाप्रकारची रोषणाई करतात. त्यांची तक्रार आली तर तात्काळ त्यांना रोषणाई काढण्यास सांगितले जाते. जे हेतुपुरस्सर रोषणाई करत आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यामुळे झाडांवर कोणी विद्युत रोषणाई केली असेल त्यांनी ती तात्काळ काढून टाकावी. – संजय जाधव उपायुक्त, उद्यान विभाग.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kdmc garden department warns action against decorative lighting on trees on occasion of the new year zws