कल्याण : लाडक्या बहिणीच्या पैशांचा हक्क आता घरातील एकाच लाभार्थी महिलेला मिळणार आहे. यासाठी शासनाने लाभार्थी महिलेला ‘या योजनेसाठी मी पात्र आहे’ (केवायसी) अशाप्रकारची कागदपत्रे स्थानिक तपासणी केंद्रात १८ नोव्हेंंबरपर्यंत सादर करण्यास सांगितली आहेत. मागील दीड वर्षाच्या कालावधीत शहरांसह खेडेगावातील घरातील प्रत्येक महिलेने या योजनेचा लाभ घेतला. आता या योजनेचा लाभ घरातील एकच महिलेला मिळणार आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये घराघरांमध्ये लाडक्या बहिणीच्या पैशाचा लाभ मीच घेणार, या विषयांवरून सासू, सुना आणि जावांमध्ये भांडणे सुरू आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यावरून ग्रामीण, आदिवासी भागातील काही घरांमध्ये महिलांमध्ये दिवाळी आनंदाच्या सणाच्या काळात जोरदार वादावादी झाल्याची माहिती आहे. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत घरातील प्रत्येक महिलेने आपले कागदपत्र सादर करून लाडक्या बहिणीच्या दीड हजार रूपयांच्या योजनेचा लाभ घेतला. हे पैसे बँकेतून काढण्यासाठी महिलांच्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण बँकांच्या दारात सकाळपासून ते बँकेची वेळ संपण्याच्या काळापर्यंत रांगा लागत होत्या. बँकेत आपला क्रमांक प्रथम लागावा म्हणून अनेक ज्येष्ठ, वृध्द महिला बँकेची उघडण्याची वेळ सकाळी साडे नऊ वाजता असली तरी सकाळी सहा वाजल्यापासून बँकेच्या प्रवेशव्दारात रांगा लावून उभ्या असायच्या. यावेळी पावसाची चिंता या महिलांनी कधी केली नाही.
हाती दीड हजार रूपये असल्यामुळे महिलांंना घरातील कोणासमोर पैसे मागण्याची गरज लागत नव्हती. लाडक्या बहिणीच्या पैशातून अनेक महिला आपल्या आवडत्या वस्तूच्या खरेदीसाठी बाजारहट करत होत्या. हक्काचा पैसा असल्याने त्यावर पतीचे किंवा घरातील सासू, सासरे यांचेही नियंत्रण नव्हते. या पैशातून सणवाराप्रमाणे बांगड्या, काही वृध्द महिलांना मशिरीसाठी तंबाखू, आपल्या लेकसाठी आणि तिच्या मुलांसाठी खाऊ, स्वतासाठी कपडे खरेदी अशी दरमहा उलाढाल करत होत्या. आपला हक्काचा पैसा अधिकारवाणीने वापरण्याची सवय झाल्याने ग्रामीण भागातील प्रत्येक घरातील महिला लाडक्या बहिणीचा लाभ मीच घेणार म्हणून अडून बसल्या आहेत.
घरातील मोठी सून, धाकटी सूनही या योजनेची मीच लाभार्थी आहे म्हणून सासूला विरोध करतानाचे दृश्य ग्रामीण भागात आहे. घरातील प्रत्येक महिला लाडकी योजनेच्या पैशावर हक्क सांगून कोणीही माघार घेण्यास तयार नाही. त्यामुळे ग्रामीण, आदिवासी भागात दररोज घराघरांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. यामध्ये घरातील पुरूष मंडळींचे काही चालत नसल्याने हे वाद मिटत नसल्याचे चित्र आहे. घरात लाडक्या बहिणींच्या केवायसीचा विषय उपस्थित झाला की महिलांमध्ये भांडणे सुरू होतात. अनेक वेळा महिलांच्या या रागात घरातील गॅस, चुली पेटत नसल्याने भोजनावर संक्रांत येत असल्याचे समजते.
घराघरांमध्ये ही भांडणे सुरू असल्याने गावातील पोलीस पाटील, सरपंचांची ही भांडणे मिटवताना दमछाक होत आहे. आपणास या योजनेच्या लाभासाठी घरातून बाद केले जात आहे म्हणून काही महिलांनी रागाने माहेरी जाऊन राहणे पसंत केले आहे. घरातील बहुतांशी सासू या योजनेचा लाभ मलाच मिळाला पाहिजे म्हणून आग्रही असल्याचे ग्रामीण भागात चित्र आहे.
