कल्याण : टिटवाळा-बनेली येथील २५ एकरच्या एका मोकळ्या भूखंडावर भूमाफियांनी बेकायदा चाळी उभारण्याचा सपाटा लावला आहे. राजरोस बेकायदा चाळींची बांधकामे सुरू असताना या बेकायदा चाळींवर अ प्रभागाकडून फक्त दिखाव्या पुरती कारवाई केली जाते, अशा तक्रारी स्थानिक रहिवाशांनी केल्या आहेत.

अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त किशोर खुताडे यांच्या आशीर्वादाने ही बेकायदा चाळींची बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक रहिवासी करत आहेत. यासंबंधीच्या चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील टिटवाला बनेली भागातील २५ एकरचा मोकळा भूखंड भूमाफियांनी बेकायदा चाळी बांधून हडप करण्यास सुरुवात केली आहे. तरीही अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त आणि तोडकाम पथक, बीट मुकादम हा सगळा प्रकार कारवाई न करता पाहत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी अनेक नागरिकांनी पालिका मुख्यालयात तक्रारी केल्या आहेत.

हेही वाचा…डोंबिवलीतील विकासकांकडून घर खरेदीदारांची एक कोटीची फसवणूक

या मोकळ्या भूखंडावर वीटा, वाळू, दगडी जोते सज्ज ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक माफियाने आपल्या भौगोलिक हद्दी निश्चित करून त्यामध्ये बेकायदा चाळी उभारण्याची कामे सुरू केली आहेत. टिटवाळा, बनेली, बल्याणी परिसरात मुंबईतील देवनार, तर्भे, माहिम भागातील चाळी, झोपडपट्टीतील नागरिक अधिक संख्येने या भागात कमी दराने घरे विकत मिळतात म्हणून येत आहेत. एक खोली चार ते पाच लाखांना विकून भूमाफिया मोकळे होतात. या बेकायदा चाळींमुळे परिसरातील नैसर्गिक नाले बुजविले जात आहेत. बांधकामांच्या भरावासाठी माती खोदून तेथे खोल खड्डे खोदले जात आहेत.

टिटवाळा, मांडा भागातील बनेली परिसर हा एकमेव मोकळा पट्टा आहे. तोही आता माफियांच्या बेकायदा चाळींच्या विळख्यात चालल्याने स्थानिक रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. पावसाळ्यात या सर्व बेकायदा चाळींना पावसाच्या पाण्याच्या विळखा पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा…ठाणे : बनावट प्रमाणपत्राच्या आधारे पोलीस भरतीचा प्रयत्न, निवड झालेल्या दोन उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल

महसूल विभागाचेही या महत्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष आहे. लाखो रूपयांचे स्वामीत्वधन माफिया बुडवत आहेत. पालिका हद्दीत एकही नवीन बेकायदा बांधकाम होणार नाही, असे आश्वासन आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी मुंबई उच्च न्यायालयात लेखी स्वरूपात देऊनही ग, आय, फ प्रभागातील साहाय्यक आयुक्त सोडले तर बाकी साहाय्यक आयुक्त बेकायदा बांधकामांना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. डोंबिवलीत ह प्रभागात राजेश सावंत यांच्याविषयी बेकायदा बांधकामांची पाठराखण करतात म्हणून खूप तक्रारी वाढत आहेत. अतिक्रमण नियंत्रण उपायुक्तांकडे या साहाय्यक आयुक्तांच्या अनेक तक्रारी गेल्या असल्याचे समजते. आयुक्त डॉ. जाखड यांनी बेकायदा बांधकामांची पाठराखण करणाऱ्या साहाय्यक आयुक्तांना मूळ पदावर आणण्याची आणि शासन, पालिका सेवेतील तडफदार साहाय्यक आयुक्तांना प्रभागात नियुक्त करण्याची मागणी नागरिकांकडून पुन्हा जोर धरू लागली आहे.

हेही वाचा…ठाण्यात हरित कचऱ्याची डोकेदुखी; रस्त्यावर जागोजागी छाटलेले वृक्ष पडून

टिटवाळा बनेली भागात नियमित कारवाई केली जाते. कालच त्या ठिकाणी तोडकामाची कारवाई करून २८ खोल्या तोडल्या. -किशोर खुताडे,साहाय्यक आयुक्त, अ प्रभाग, टिटवाळा.