बदलापूर : संपन्न जंगलामुळे वन्यजीवांचा वावर असलेल्या बदलापूर आणि आसपासच्या जंगल परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हालचाली पाहण्यात आल्या होत्या.  चामटोली भागात बिबट्या असल्याच्या चर्चा रंगत असतानाच आता बदलापूरपासून काही अंतरावर असलेल्या राहटोली भागातही बिबट्य़ाचा वावर असल्याचे समोर आले आहे. वन विभागाच्या वतीने येथील ग्रामस्थांना खबरदार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तशी जनजागृती वन विभागाकडून केली जाते आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर आणि आसपासचा जंगल संपन्न जंगल म्हणून ओळखले जाते. या भागात वन्यजीवांची संख्या मोठी आहे. विविध प्राणी, पक्ष यांचा जंगलात वावर अनेकदा नोंदवला गेला आहे. प्रत्येक वर्षात बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने वन विभागाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या प्राणी गणनेत प्राण्यांची संख्या समाधानकारक असल्याचे दिसून आले. यात बिबट्याचा वावरही असल्याचे दिसून आले आहे. वर्षाच्या सुरूवातीला कल्याण आणि अंबरनाथ तालुक्याच्या वेशीवर बिबट्या असल्याचे समोर आले होते. जुन्नर वनपरिक्षेत्रातून हा बिबट्या लांबचा प्रवास करत या भागात आला होता. त्याचा प्रवास रेडीओ कॉलरच्या माध्यमातून पाहिला जात होता. या बिबट्याने अनेक पाळीव जनावरांची शिकार केली होती. त्यानंतर बिबट्याच्या अधिक हालचाली या भागात नोंदवल्या गेल्या नव्हत्या.

हेही वाचा : डोंबिवलीत महिलेला तरुणाची बेदम मारहाण

मात्र गेल्या महिन्यात बदलापुरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या चामटोली भागात बिबट्या असल्य़ाचे ग्रामस्थांनी वन विभागाच्या निदर्शनास आणून दिले होते. ग्रामस्थांच्या कोंबड्या या बिबट्याने फस्त केल्याचा दावा द्रामस्थांनी केला होता. त्यानंतर वन विभागाने बिबट्याचा शोध घेण्यास सुरूवात केली होती. त्याला महिना उलटत नाही तोच आता बदलापुरपासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या राहटोली गावाच्या आसपासच्या भागातही बिबट्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. बदलापूर मुरबाड मार्गावर राहटोली हे गाव आहे. येथेही घनदाट जंगल आहे. राहटोलीजवळील मुळगाव, लव्हाळी  बोराडपाडा, बारवी धरण रस्ता आणि धरण परिसर निसर्गसंपन्न आहे. त्यामुळे यापूर्वीही बिबट्याचा वावर नोंदवला गेल्याचे वन विभागाने सांगितले आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनंतर वन विभागाने या भागातही ग्रामस्थांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard in badlapur alert for peoples forest department tmb 01
First published on: 10-10-2022 at 13:15 IST