कल्याण- मध्य रेल्वेच्या टिटवाळा ते आंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान बुधवारी सकाळी साडे सात वाजता सिग्नल यंत्रणेत काही वेळ बिघाड झाला होता. त्यामुळे कल्याणकडून कसारा आणि कसाराकडून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल काही वेळ ठप्प होत्या. १५ मिनिटात हा बिघाड दूर केल्यानंतर लोकल वाहतूक पूर्ववत करण्यात आली, अशी माहिती रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>कल्याण मधील कोटक महिंद्रा बँकेत बनावट नोटा जिरवण्याचा ग्राहकाचा प्रयत्न

सकाळी गर्दीच्या वेळेत सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने तंत्रज्ञांना पाचारण केले. सिग्नल यंत्रणेतील बिघाड दूर केला. त्यानंतर या मार्गावरील लोकल सेवा पूर्ववत झाली, अशी माहिती प्रवाशांनी दिली. या बिघाडामुळे लोकल वाहतूक विस्कळीत होऊन लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. सकाळी वेळेत कार्यालय गाठण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रवाशांना या विस्कळीतपणाचा फटका बसला.कल्याण मधील बाजारातून भाजीपाला, फळे खरेदी करुन गाव परिसरात विक्रीसाठी जाणाऱ्या विक्रेत्यांना लोकल उशिरा धावत असल्याचा फटका बसला.

हेही वाचा >>>ठाणे: कामे निकृष्ट दर्जाची झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार; आयुक्तांचा अधिकाऱ्यांना इशारा

कसाराकडून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गेल्या काही महिन्यांपासून उशिराने धावत आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांकडे रेल्वे प्रवासी संघटनांनी अनेक निवेदने, प्रत्यक्ष भेटी घेतल्या आहेत. तरीही त्यात सुधारणा होत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.गेल्या महिन्यात नाराज प्रवाशांनी टिटवाळा रेल्वे स्थानकात लोकल उशिरा धावतात म्हणून आंदोलन केले होते. त्यावेळी टिटवाळा रेल्वे स्थानक व्यवस्थापकांनी लोकल वेळेत धावतील असे लेखी लिहून दिल्यानंतर प्रवाशांनी आंदोलन काही वेळ स्थगित केले होते. आसनगाव ते खर्डी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान नियमित मालगाडी घसरणे, सिग्नल यंत्रणेत बिघाड होत असल्याने ग्रामीण भाग म्हणून रेल्वे प्रशासन या भागाकडे दुर्लक्ष करते का, असे प्रश्न कल्याण कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे शैलेश राऊत यांनी रेल्वे प्रशासनाला केले आहेत.

मागील दोन वर्षापासून आसनगाव रेल्वे स्थानकातील कसारा बाजुकडील जिना उभारण्यात येत नाही. वासिंद रेल्वे स्थानकात अनेक समस्या आहेत, असे रेल्वे प्रवासी संघटनांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local train delay due to signal failure near titwala amy
First published on: 07-12-2022 at 12:57 IST